नगर : झेडपी पहिली ते तिसरीतील मुलं ‘ढ’! | पुढारी

नगर : झेडपी पहिली ते तिसरीतील मुलं ‘ढ’!

नगर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या दोन वर्षांत मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यानंतर शाळा सुरू झाल्या, अध्ययन सुरू झाले, मात्र अजुनही मुलांची प्रगती चिंताजनकच असल्याचे अध्ययन स्तर निश्चितीतून समोर आले आहे. जिल्ह्याची अंतिम स्तर टक्केवारी पाहता भाषा विषयांत सरासरी 37.70, तर गणितात केवळ 30.05 टक्के विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे पहिली, दुसरीचे अजुनही अनेक विद्यार्थी हे वाचन, लेखन, बेरीज, वजाबाकीत ‘ढ’ असल्याचे दिसले. मात्र शिक्षकांनी या अहवालावर कृती आराखडा तयार केला असून, यातून दुसर्‍या सत्रात हीच टक्केवारी 80 टक्केच्या पुढे नेण्यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी संकल्प केला आहे.

झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग हे नेहमीच प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून निपूण भारत अभियान पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अंतर्गत 1 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी घेतली होती. यामध्ये 3437 शाळांमधील 2 लाख 91 हजार 104 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच 3667 दिव्यांग विद्याथ्यार्ंंचेही बुद्धीमापन चाचणी घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे, त्यांना लिहिता, वाचता येते का, बेरीज, वजाबाकी, भागाकार जमतो का? याविषयी चाचणी झाली. ,

डायटचे प्राचार्य खारके यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित या विषयांची अध्ययन चाचणी झाली. या चाचणीचा अहवाल काल जिल्हा परिषदेमध्ये सादर करण्यात आला. पहिलीच्या अनेक मुलांना अद्यापही साधे वाक्य वाचन जमत नाही, दुसरीची अनेक मुले ही समजपूर्वक वाचनात मागे आहेत. जोडाक्षरयुक्त वाक्यांतही आणखी प्रगती अपेेक्षित आहे. तिसरीचीही अशीच काही परिस्थती आहे. या विद्यार्थ्यांसाठीही शिक्षकांना आणखी काम करावे लागणार आहे.

भाषेपेक्षाही गणितात विद्यार्थी मागे दिसत आहे. याला कोरोना काळातील शाळा बंद असल्याचे कारण असले, तरी ही घडी पूर्वपदावर आणण्यासाठी शिक्षण विभागाला आणखी काम करावे लागणार आहे. याउलट चौथी आणि पाचवीची गुणवत्ता समाधानकारक आहे. मुलांची प्रगती आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी तालुकानिहाय अध्ययन स्तराचा आढावा घेताना सर्वच तालुक्यांतील स्तर हा 80 टक्केच्या पुढे आला पाहिजे, यासाठी सूचना केल्यात.

सर्वच तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत.डिसेंबरमधील द्वितीय चाचणीमध्ये प्रगतीत आणखी सुधारणा दिसेल.

                                                            भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी

निपूर्ण भारत अभियानांतर्गत अध्ययन स्तर पहिली चाचणी झाली. डिसेंबरमध्ये दुसरी, आणि मार्चमध्ये तिसरी चाचणी होईल. नगरची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना आणखी काम करावे लागेल. दुसर्‍या चाचणीत निश्चितच प्रगती दिसेल.

                                                         भगवान खारके, प्राचार्य डाएट

तालुका भाषा गणित

(किमान 50 टक्के अपेक्षित)
श्रीगोंदा 50.74 42.99
पारनेर 50.17 44.51
संगमनेर 41.97 34.47
नगर 41.22 30.74
अकोले 40.58 35.25
नेवासा 35.66 28.95
कर्जत 34.16 28.65
कोपरगाव 33.61 27.22
पाथर्डी 32.22 25. 21
राहुरी 31.74 30.97
श्रीरामपूर 30.39 22.88
राहाता 29.79 25.76
मनपा 29.37 23.34
शेवगाव 24.70 24.13
जामखेड 21.76 25.01

Back to top button