नगर : धरणे भरली मात्र नियोजन रखडले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सर्वच धरणे यंदा काठोकाठ भरलेली आहेत. रब्बी हंगाम सुरु होण्यापूर्वीच या धरणांतील पाणीवापराचे नियोजन होते. परंतु यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने, नदी, नाले वाहून भूजलपातळी वाढली. त्यामुळे विहिरींतही पाणी खेळत आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी अद्याप धरणांच्या पाण्याची मागणी झालेली नाही. त्यामुळे पाणीवापराच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक तूर्तास झालेली नाही. यंदाचा पावसाळा देखील सरासरीपेक्षा अधिक होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासूनच मुळा, भंडारदरा, निळवंडे व इतर लहान धरणांतून विसर्ग सुरु होता. त्यामुळे नद्या दुथडी वाहिल्या. नदी, नाले सतत वाहिल्याने भूजलपातळी देखील वाढली. परिणामी गावशिवारातील विहिरी देखील पाण्याने भरुन गेल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतरही अतिवृष्टी सुरुच होती. त्यामुळे धरणांतील विसर्ग सुरुच होता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी यंदा पाणीच पाणी झाले आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला. शेतशिवारात पाणीच पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी रखडल्या आहेत. एकंदरीत रब्बी पेरणी 50 टक्क्यांच्या आसपास खोळंबली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी धरणांतील पाण्याची मागणी होते. त्यामुळे रब्बीचे एक आवर्तन कमी करुन ते खरीप हंगामासाठी दिले जाते. यंदा मात्र, विहिरी पाण्याने भरल्या आहेत. शेतशिवारात अद्याप पाणी असल्याने रब्बीची पेरणी रखडली. त्यामुळे धरणांतील पाणी मागणी होताना दिसत नाही.यंदा रब्बी हंगामासाठी व उन्हाळी पिकांसाठी मुळा धरणाच्या पाणीवापराचे नियोजन देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी किती पाणी वापरावे याचा निर्णय कालवा सल्लागार समिती बैठकीत होत असतो. सध्या मागणी नाही. पाण्याची मागणी वाढल्यानंतर कालवा सल्लागार समिती बैठकांच्या हालचाली सुरु होण्याची शक्यता आहे.
रब्बी आवर्तनावर आचारसंहितेचे सावट
18 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे 9 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांना करता येणार नाही. त्यामुळे रब्बीचे आवर्तन आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे.
सिंचनासाठी 14 टीएमसीपेक्षा अधिक पाणी
मुळा धरणातील जवळपास 14 टीएमसी पाणी सिंचनासाठी तर 2 टीएमसी पाणी नगर मनपा, नगरपालिका तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव ठेवले जात आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामासाठी 1 व उन्हाळी पिकांसाठी दोन आवर्तने दिली होती. यंदा रब्बीसाठी अद्याप कोणी मागणी केली नाही. भरपूर पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना आवर्तन सोडण्याची गरज भासली नसल्याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.