नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे एका आयशर टेम्पोतून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकत पाच हजार किलो गोमांस जप्त केले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नगर तालुका पोलिसांनी यांनी मिळून केली. मोहसीन मेहमुद खान (रा. कोठला, अहमदनगर), सलीम कलीम कुरेशी (रा. कुरेशी हॉटेल जवळ, अहमदनगर मुळ रा. बहिराईच, बरेली, जि. लखनऊ, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
नगर कडून जामखेडच्या दिशेने एक लाल रंगाचा आयशर मधून गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करण्यासाठी नेले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी नगर-जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे सापळा लावून लाल रंगाच्या टेम्पोला थांबविले. टेम्पोची झडली घेतली असता टेम्पोत गोमांस व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे आढळून आली. ताब्यात घेतलेल्या दोघांना विचारपूस केली असता गोमांस नगरमधी तौफिक कुरेशी व अब्दुल बारी कुरेशी यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी गोमांस तसेच टेम्पो असा चौदा लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक रविकिरण बाबुराव सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.