नगरच्या उड्डाणपुलावर सेल्फीची धूम..!

नगर : पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित असलेल्या नगरच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि.19) करण्यात आले. त्यानंतर नगरकरांनी रविवारी सुट्टीचा दिवस नव्या उड्डाणपुलावर फोटो सेशन करून घालविला. उड्डाणपूल कधी पूर्ण होतो अन् कधी त्यावरून फेरफटका मारता येतो, याची वाट नगरकर पाहत होते. त्यामुळे हौसेखातर उड्डाणपुलावरून रविवारी शहरवासियांनी फेरफटका मारून सेल्फी काढण्याचा आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले.
शहरातील तीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाचे डिजिटल उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. नगरमध्ये उड्डाणपूल व्हावा, अशी आशा असलेल्या नगरकरांना उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर मोठा आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः सर्वच दृष्टीने उड्डाणपूल पूर्णत्वास गेल्याने नगरकरांना दिलासा मिळणार आहे. दररोज होणार्या वाहतूक कोंडीतून नगरकरांची उड्डाणपुलामुळे कायमची सुटका झाली आहे. दरम्यान, आता उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर रविवारी नगरकरांनी हौसेखातर उड्डाणपुलावर चांगलीच गर्दी केेली होती. मात्र, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काही जणांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले.
दुघर्टना घडण्याची शक्यता
उड्डाणपुलावर हौशी मोबाईल फोटोग्राफरचाही समावेश आहे. दरम्यान, काहीजण धोकादायक पद्धतीने फोटो व सेल्फी घेत असल्याचे दिसून आले. शिवाय तरुणाईकडून भरधाव दुचाकी पळविणे व व्हिडिओ घेणे,राँग साईडने वाहन चालविणे, असे प्रकारही उड्डाणपुलावर सुरू झाल्याने दुघर्टना होण्याची शक्यता आहे.
वेगाला हवा आवर
उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या नियमांसाठी वेगमर्यादेचे पालन गरजेचे आहे. विशेषतः दुचाकी चालक अगदी निष्काळजीपणे वाहन चालवित असल्याचे दिसून आले. त्यामुळे अपघात होऊ शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांवर कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अबालवृद्धांनी घेतला आनंद
नगरमधील उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करणात आला आहे. या उड्डाणपुलावर तरुणांची सेल्फी काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळते आहे. उड्डाणपूल पाहण्यासाठी तरूणाईसह अबालवृद्धांची रात्री गर्दी दिसून येत आहे. रविवारी दिवसभर उड्डाणपूल जणूकाही सेल्फी पॉईंट असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.