श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधरांच्या अधिसभा (सिनेट) सदस्य निवडणुकीसाठी आज (रविवारी) घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी अवघे 32 टक्के इतके अत्यल्प मतदान झाले. दरम्यान, 46 पुरुष तर 7 महिला नोंदणीकृत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयात शहरातील मतदारांसाठी मतदानाचे केंद्र निश्चित करण्यात आले होते. 10 जागांसाठी सुमारे 37 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. त्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे 600 तर शहरात अवघे 163 नोंदणीकृत पदवीधर मतदार होते. यामुळे हजारो पदवीधर यापासून वंचित राहिले. अनेक पदवीधरांनी पुणे विद्यापीठाच्या या वृत्तीचा निषेध केला आहे. अनेक मतदारांशी उमेदवारांनी संपर्कही केला नसल्याचे मतदानास्थळी दिसले.
या निवडणुकीत एस. सी. मतदार संघात रोहित कुचेकर, राहुल पाखरे, राहुल ससाने, संदीप शिंदे, शशिकांत तीकोटे , एस.टी. मतदार संघात देवराम चाटे, हेमंत कडले, गणपत नांगरे, विश्वनाथ पाडवी तसेच एन. टी. मतदार संघात अमोल खाडे, अजिंक्य पालकर, निलेश सानप, विजय सोनवणे तर इतर मागासवर्गीय मतदार संघात मयूर भुजबळ, सचिन गोरडे, श्रीकृष्ण मुरकुटे,महेंद्र पठारे तर महिला मधून डॉ. तबस्सुम इनामदार व बागेश्री माथलकर
याशिवाय खुल्या मतदार संघात महेश अग्रे, बाकीराव बसते, नारायण चाके, सुनील दळवी, संतोष ढोरे ,प्रसन्नजीत फडवणीस, सुनील गुलदगड, अभिषेक जोशी,मनीषा कामनकर, सोमनाथ लोहार, विवेक मरभाई, संजीत कुमार मेहता,युवराज नरवडे, वाहीद शेख, दादाभाऊ सिनलकर, सागर वैद्य, संजय यादव, आकाश झांबरे या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी पुरस्कृत सावित्रीबाई फुले प्रगती मंडळ तर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच अशी ही लढत झाली.
बोरावके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारांच्या छायाचित्रासह मोठा फ्लेक्स लावण्यात आला होता तर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचे काही कार्यकर्ते मतदानासाठी येणार्या मतदारांना त्यांच्या क्रमांकासह पुढील मार्गदर्शन करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता या स्थळी उपस्थित नव्हता. मतदान करताना अनेकांचा गोंधळ उडाला. मतदान केंद्रात मतदारांची नावे शोधण्यातच वेळ वाया जात होता. बेलापूर महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यापीठ विकास मंचच्या कार्यकर्त्यांच्या नजरेस हि बाब आणून देत मतदारांना मतदानासाठी जाताना कोणत्या कलरच्या बॅलेट पेपरवर कोणाला मतदान करावयाचे आहे, त्यासाठी समुपदेशन केले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून प्रा. सुनील चोळके यांनी काम पाहिले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर अधिसभा सिनेट निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत निष्क्रियपणे राबविण्यात आली आहे. श्रीरामपूर शहरातील अनेक मतदारांची नावे मतदानासाठी थेट दुसर्या तालुक्यात टाकण्यात आली. नावे नोंदवूनही मतदार यादीत काही पदवीधरांची नावे आली नाहीत. मतदारांमध्ये जागृतीच झाली नसल्याने उमेदवार कोण आहेत आणि किती उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत ,अनेक मतदार एकमेकांना विचारीत असल्याचे निदर्शनास आले.
– शफीक बागवान, नोंदणीकृत पदवीधर मतदार श्रीरामपूर