कोळपेवाडी : विवाह नोंदणी संस्था की लूटमारी केंद्र? रक्कम येताच मोबाईल ‘नॉट रिचेबल’ | पुढारी

कोळपेवाडी : विवाह नोंदणी संस्था की लूटमारी केंद्र? रक्कम येताच मोबाईल ‘नॉट रिचेबल’

कोळपेवाडी : वंशाला दिवा हवाच, या अट्टाहासाची किंमत आज सर्वांना मोजावी लागत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे विवाह नोंदणी केंद्रांना सुगीचे दिवस आले. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विवाह नोंदणी संस्था जणू सध्या लुटमारीचे केंद्र झाल्याचे भयावह चित्र सर्वत्र दिसत आहे. या विवाह नोंदणी संस्थांची चौकशी करून यापुढे अशा बोगस संस्थांवर कायद्याचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे. जमाना बदलला की, परिस्थिती बदलते. बदलेल्या परिस्थितीनुसार आपण वागू लागतो. त्यावेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेक समस्या निर्माण होतात.

अशाच समस्या सध्या उपवर मुला- मुलींचे विवाह जुळण्यात निर्माण झाल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम देखील दिसत आहेत. या परिस्थितीचा समाजातील काही महाविद्वान व्यक्ती फायदा घेवून उपवर मुलांच्या पालकांना लुबाडत असल्याचे समोर आले आहे. याबाबत अजून तरी पोलिसात कुणी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावत आहे.’ याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. यामध्ये उपवर मुलाचे परिचय पत्र एका विवाह नोंदणी संस्थेकडून दुसर्‍या विवाह नोंदणी संस्थेकडे जाते. त्यानंतर या विवाह नोंदणी संस्थेकडून एक महिला अतिशय सभ्य भाषेत संवाद साधून संबंधित परिचय पत्रातील वराच्या पालकांना सांगते की, ‘तुमच्या मुलासाठी अर्थात परिचय पत्रातील ‘वर’ मुलासाठी आमच्याकडे एक स्थळ आहे. त्यांना तुमच्या मुलाचे परिचय पत्र आवडले आहे.

त्यांच्याशी पुढील बोलणी करायची का? आम्ही तुमच्याशी त्यांचा संपर्क करून देवू.’ या संभाषणातून वराच्या पालकांना जणू वाळवंटात ‘ओअ‍ॅसिस’ सापडल्याचा झालेला आनंद समोरच्या व्यक्तीकडून नेमका हेरला जातो. ‘त्यांना विवाह संस्थेत नाव नोंदणी करण्यासाठी कमीत- कमी 4 हजार रुपये भरावे लागतील,’ असे फोनवर बोलणारी व्यक्ती सांगते. संबंधित मुलीकडील पालकांनी आमच्याकडे 4 हजार रुपये भरून नोंदणी केली आहे. तुम्ही नोंदणीसाठी 4 हजार रुपये ऑनलाईन पाठवा,’ असे सांगते. त्याप्रमाणे वराचे पालक 4 हजार रुपये ऑनलाईन पाठवतात, मात्र पैसे मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून सुचविलेल्या मुलीच्या स्थळाबाबत काही दिवस कोणताच प्रतिसाद मिळत नाही. यानंतर संबंधित व्यक्तीशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास तो फोन ‘नॉट रिचेबल’ किंवा ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असल्याचे उत्तर मिळते. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे उपवर मुलाच्या पालकांच्या लक्षात येते, मात्र तापर्यंत वेळ निघून गेलेली असते.
(क्रमश: – भाग -1)

उपवर मुलांच्या पालकांना लुटीचा गोरख धंदा!

मुलाच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे मागील काही वर्षांपासून उपवर मुलांचे विवाह जमविणे, ही मोठी समस्या होऊन बसली आहे. मुलाला सरकारी नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, कुटुंब छोटे पाहिजे, अशा अनेक उपवर मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा असल्यामुळे यापैकी एकही गोष्ट कमी असली तरी साधी विचारपूस देखील केली जात नाही. त्यामुळे अशा संधीचा समाजातील काही संधीसाधू व्यक्ती फायदा घेत आहे. विवाह नोंदणी संस्थांच्या नावाखाली लग्नासाठी इच्छुक असणार्‍या उपवर मुलांच्या पालकांना लुटण्याचा गोरखधंदाच काही विवाह नोंदणी संस्थांनी मांडला आहे.

Back to top button