राहुरी : अवैध गौण खनिजप्रकरणी15 लाखांचा दंड ! वाळू तस्कर धास्तावले | पुढारी

राहुरी : अवैध गौण खनिजप्रकरणी15 लाखांचा दंड ! वाळू तस्कर धास्तावले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी महसूल प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा फास आवळला आहे. गौण खनिजाबाबत कारवाईचा धडाका हाती घेतल्याने अवैध वाळू, मुरूम व माती वाहतुकदारांमध्ये धडकी भरली आहे. गेल्या 9 महिन्यांमध्ये 22 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यातून 15 लाखाचा दंड वसुल करून शासकीय तिजोरीत रक्कम जमा करण्यात आला आहे. राहुरी महसूल प्रशासनाने तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू, मुरूम व माती वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारत दंड वसुली जोमात सुरू केली आहे.

मुळा व प्रवरा नदी पात्राचे विस्तीर्ण पात्र लाभल्याने राहुरी हद्दीत अवैध धंदे करणार्‍यांचे चांगलेच फावले जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाळू तस्करी होत असल्याने राहुरीतील गुन्हेगारी वाढली आहे. वाळू वाहतुकीच्या माध्यमातून अल्पावधीत अमाप पैसा गोळा करायचा. यातून सर्वसामान्यांसह प्रशासनास स्वतःच्या बोटावर नाचविण्याचा प्रयत्न करायचा हे सर्वश्रृत झाले आहे. परिणामी राहुरी तालुक्यामध्ये अवैध वाळू धंद्यातल्या अनेक पठ्ठ्यांच्या हातामध्ये खुलेआम गावठी कट्टा दिसतात.

गावठी कट्टे घेऊन नदी पात्रामध्ये धुडगूस घालणार्‍यांवर कारवाई करण्यास कोणीही धजत नसल्याचे वास्तव चित्र दिसले. अखेर गत वर्षभरापासून अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांवर अंकूश ठेवण्यासाठी तहसीलदार शेख, नायब तहसीलदार पुनम दंडिले, संध्या दळवी, सचिन औटी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने ठिक-ठिकाणी छापेमारी करीत अवैध धंदे करणार्‍यांवर धडक कारवाई केली.

यामध्ये मुरूम, खडी, डबर व माती उत्खनन करणारे 10 ट्रक, ढंपर व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. संबंधितांवर 21 लक्ष 50 हजार 550 रूपये दंड आकारणी करीत त्यापैकी 10 लक्ष 69 हजार 825 रूपये वसूल करण्यात आले. अवैध वाळू वाहतूक करणारे अ‍ॅपे, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर अशा 12 वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांवर 14 लक्ष 33 हजार 25 रूपये असा दंड आकारण्यात आला. त्यापैकी 4 लक्ष 77 हजार 54 रूपये वसूल होऊन संबंधित रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात आलेली आहे.

याप्रमाणे राहुरी महसूल प्रशासनाकडून मुळा व प्रवरा पात्रासह नगर मनमाड रस्त्यावरून अवैध गौण खनिज वाहतुक करणार्‍यांवर कारवाई झाल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मुळा व प्रवरा नदी पात्र गेल्या तीन- चार महिन्यांपासून वाहते होते. पाणी वाहत असल्याने अवैध वाळू उपसा करणार्‍यांनी थांबा घेतला होता, परंतु नदी प्रवाह थांबताच वाळू वाहणार्‍यांनी धुडगूस घालण्यास प्रारंभ केला. त्यामुळे महसूल प्रशासनाने अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी सुरू केलेली कारवाई चांगलीच चर्चेची ठरत आहे.

मुळा नदी पात्रात बारागाव नांदूर, डिग्रस, देसवंडी, आरडगाव, मानोरी, वळण येथून तर प्रवरा नदी पात्रातील सोनगाव, सात्रळ, पाथरे, लाख, माहेगाव, जातप आदी हद्दीतून वाळू उपसा जोमात होत होता. माती व मुरूम उत्खनन करणार्‍यांनी आपला वरचष्मा दाखवित गुंडशाही सुरू केली आहे. राहुरी फॅक्टरी, तांभेरे, ताहाराबाद, म्हैसगाव, कणगर या पट्ट्यामध्ये सर्वसामान्यांवर वचक निर्माण करून मुरूम तस्कर झालेल्यांनी धुमाकूळ घातला आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, कारवाई होऊनही मुरूम व माती उत्खनन करणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने यावर उचित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

त्या उद्योजक ठेकेदाराच्या कानशिलात लगावली

राहुरी फॅक्टरी, कणगर, ताहाराबाद, चिंचाळे पट्ट्यातून मुरूम व माती उत्खनन करणार्‍यांमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. एका छोट्या तरूणाने उद्योजक व ठेकेदारीत अग्रेसर असणार्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याने तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. परिसरामध्ये गुंडगिरीने निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई हाती घेण्याची मागणी होत आहे.

Back to top button