सीना नदीवर नवीन पूल उभारा ; आ.संग्राम जगताप यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरींकडे मागणी

नगर : पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका हद्दीतून जाणार्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर नालेगाव येथे सीना नदीवर असणारा पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतुकीसाठी हा महामार्ग 14 ते 18 तास बंद ठेवावा लागतो. त्यामुळे याठिकाणी नदीवर नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आलेले केंद्रीयमंत्री गडकरी यांना त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले. सदर पुलाचे बांधकाम 1984 साली झालेले असल्याने त्यास 35 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला आहे. सदर पुलाला 3 मीटरचे प्रत्येकी 10 गाळे असून, पुलाची एकूण लांबी 30 मीटर व रुंदी 7 मीटर आहे.
या पुलामुळे महापालिका हद्दीतील विद्या कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि इतर रहिवासी भाग नगर शहराला जोडले गेले आहेत. सदर पूल राष्ट्रीय महामार्गावर असूनसुद्धा वाहतुकीसाठी दरवर्षी पावसाळ्यामध्ये अनेक वेळेस बंद ठेवावा लागतो. कल्याण रोड परिसर हा झपाट्याने विकसित होणारे उपनगर आहे. हा पूल बंद असताना येथील नागरिकांची गैरसोय होते. या पुलावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे तसेच रस्त्यावर स्ट्रीटलाईटसह इतर सुविधा नसल्याने वाहन चालविताना चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
सदर पूल धोकादायक झालेला असून, सीना नदीतून वाहणार्या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शहर मतदारसंघातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्र.61 वरील नालेगाव येथे सीना नदीवर नवीन पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.