कुटुंबांना वार्‍यावर सोडणार नाही : आ. लंके | पुढारी

कुटुंबांना वार्‍यावर सोडणार नाही : आ. लंके

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  गायरान जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याच्या निर्णयामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर येणार आहेत. मात्र, काळजी करू नका. मी तुम्हाला वार्‍यावर सोडणार नाही. एक घर काय घराची एक वीट सुद्धा पाडू देणार नाही व राज्य शासनाला हा निर्णय मागे घेण्यासाठी फेरयाचिका दाखल करण्यास भाग पाडू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले .
तालुक्यातील पोखरी येथील गायरान जमिनी, तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासंदर्भात येथील दोनशे कुटुंबांना तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहेत.

सदर अतिक्रमणे 28 नोव्हेंबरपूर्वी काढून घेण्यास बजावले आहे. या नोटिसांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पोखरीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे व साहेबराव करंजेकर यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांनी आमदार नीलेश लंके यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला व त्यांना निवेदनही दिले. यावेळी सरपंच सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर, रामदास पाटील, साहेबराव करंजेकर, अण्णासाहेब पवार, अशोक पाटील, पंडित पवार, अशोक आहेर, सीताराम पवार, विकास शिवले, एकनाथ पवार, यादवराव फरतरे, कासम मोमीन, रफिक पटेल, निजाम पटेल, पोपट कसबे, बाळू कांबळे, रवी मैड, अनुसया फडतरे, कलुबाई फरतरे, ताराबाई आहेर, सुरेखा कुटे आदी उपस्थित होते.

Back to top button