

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात सुरू असून, ही चिंतेची बाब आहे. या आजाराची केंद्र सरकारने दखल घेतली असून, पाहणीसाठी केंद्रीय पथक लवकरच दाखल होणार असल्याचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चातून किती उपलब्धता साध्य केली, याचे सादरीकरण करण्याचे निर्देश देखील क्रीडा, कृषी व पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी शनिवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयात लम्पी स्कीन आजाराबाबत तसेच नियोजनसह विविध विकास कामांचा विभागनिहाय आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, लम्पी आजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असून, अशा परिस्थितीत देखील आता लहान जनावरांना देखील लागण झालेली आहे. जनावरांचे शंभर टक्के लसीकरण सुरु आहे. लसीकरणामुळे मृत्यूदर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. अहमदनगरपाठोपाठ बुलढाणा व जळगाव जिल्ह्यांत याची तीव्रता अधिक आहे. याबाबत केंद्रीय मंत्री यांच्याशी बोलणे झाले असून, तीव्रता अधिक असणार्या भागात केंद्रीय पथक येऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील क्रीडा विभागाची कामगिरी निराशाजनक आहे. या विभागाने किती विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकले. त्यासाठी किती जणांना प्रोत्साहित केले याचे सादरीकरण करा, असे निर्देश क्रीडा विभागाला दिले. कृषी विभागाने शासकीय निधी खर्च करुन, किती शेतकरी उभे केले. नवीन तंत्रज्ञान वाढीसाठी काय प्रयत्न केले याचे सादरीकरण महिनाभरात सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले. दुध उत्पादन वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणत्या उपाययोजना केल्या. याचा आराखडा पशुसंवर्धन विभागाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
फ्लॅटधारकांना सहकारी सोसायटी स्थापन करता येत नाही. यासाठी बिल्डर मंडळी देखील मदत करीत नसल्यास याची दखल घेतली जाईल, आवश्यकता वाटल्यास शासन धोरणात्मक निर्णय घेईल. इथेनॉल निर्मिती प्रकल्पामुळे ऊसाला अधिक दर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे एफआरपीपेक्षा कमी दर देण्याची हिंमत कोणताही साखर कारखाना दाखवित नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.
वन विभागाची परिस्थिती चांगली नाही. त्यांनी देखील कामांत सुधारणा करण्याची गरज आहे. या विभागाने नागरिक तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वन विभागाचीच भीती नागरिकांना वाटू नये,असा टोला त्यांनी लगावला. जिल्ह्याचा संपूर्ण निधी खर्च होईल.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही नौटंकी आहे. या यात्रेमुळे भारत जोडण्याचे नव्हे तर तोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधीतील वक्तव्याचा आम्ही निषेध केला. प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठीच त्यांनी सावरकरांविरोधात वक्तव्य केले, असा टोला देखील पालकमंत्री विखे पाटील यांनी लगावला आहे.
गायरानाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. राज्यभरात ही संख्या अडीच लाखांच्या घरात आहे. घरादारांपासून कोणी वंचित राहू नयेत, त्यामुळे ही कार्यवाही थांबविण्यासाठी राज्य शासन लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. मात्र, सरकारी जागेवरील अतिक्रमित दुकाने किंवा व्यावसायिक गाळे हटविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.