नगर-माळशेज काँक्रिटीकरण ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नगर-माळशेज काँक्रिटीकरण ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या पटलावर दळणवळणात नगरचे महत्व वाढविणार्‍या आणखी एका काँक्रिटीकरण रस्त्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. नगर-माळशेज हा 168 कि.मी. रस्ता काँक्रिटीकरणासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंत्री गडकरी यांनी जाहीर केला. नगर येथील उड्डाणपूल उद्घाटन समारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री आमदार राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भैय्या गंधे, सुवेंद्र गांधी, अरुण मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रफुल्ल दिवाण, मिलिंदकुमार वाबळे आदी उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपुलासाठी तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी बराच पाठपुरावा केला. त्यांच्यानंतर खासदार सुजय विखे पाटील यांनी मागे लागून या कामी यशस्वी पाठपुरावा केला. अनेक अडचणींवर मात करून हा उड्डाणपूल सुंदर पूर्ण झाला असून, तो आज खुला होत असल्याने आनंद आहे.

भूसंपादनासाठी खा. विखेंनी पुढाकार घ्यावा!

सूरत-चेेन्नई हा महामार्ग नगरच्या दृष्टीने औद्योगिक विकासाला चालना देणारा आहे. या कामाचे सोलापूर जिल्ह्यात भूसंपादन झाले आहे. खा. विखे यांच्या सहकार्याने नगर जिल्ह्यातही हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.

लॉजिस्टीक पार्कआणि स्मार्ट गावे!

ग्रीन फिल्डमुळे रोजगार निर्मितीही होणार आहे. या मार्गाच्या दुर्तफा लॉजिस्टक पार्क, औद्योगिक क्लस्टर, स्मार्ट शहर, स्मार्ट गावे उभारण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने पुढाकार घ्यावा, अशी विनंती गडकरी यांनी केली आहे. लॉजिस्टीक पार्कमुळे या रोडच्या बाजूला एक नवीन उत्पन्न स्त्रोत तयार होईल. त्यामुळे या भागातील लोकांना रोजगार मिळून सर्वांगिण विकास होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी अन्नदाताच नव्हे, उर्जादाताही बनवा!

नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सविधा निर्माण होत आहे. येथील शेतीचा विकासही चांगला झाला आहे. मी वाहतूक मंत्री असल्याने भविष्याच्या दृष्टीने सगळ्या साखर कारखानदारांना विनंती करतो की, साखर कमी तयार करा आणि इथेनॉल जास्त तयार करा. यातून येणार्‍या काळात आपला शेतकरी देखील केवळ अन्नदाता नाही, तर उर्जादाता बनला पाहिजे, असे आमचे स्वप्न आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, उड्डाण पूल हे नगरकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे हे स्वप्न साकार होत आहे. त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. याचा आनंद आहे. नगर या ऐतिहासिक शहरामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल, असा हा समारंभ आहे. या उड्डाण पुलाच्या कामाला खासदार डॉ. सुजय विखे यांनी गती दिली, मात्र स्व.दिलीप गांधी यांनी या पुलाचा मूळ पाया रोवला आहे. त्यांचे या पुलाच्या कामासाठी विशेष प्रयत्न आहेत. त्यामुळे आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तसेच लष्करप्रमुख नरोडे यांचेही यावेळी मंत्री विखे यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या विकासचक्राला गती : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन उपस्थित दर्शवताना, महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविधकामे खोळंबली होती. मात्र आता महाराष्ट्राच्या विकासचक्राला गती प्राप्त झाली आहे, असे सांगून या पुलाचे काम करताना युवा खासदार सुजय विखे पाटील यांनी उड्डाण पुलाला जोडून 85 खांब उभारले, व त्यावर शिवचरित्र चित्र रुपात साकारण्याची संकल्पना मांडली. यासाठी त्यांनी खासदार आणि आमदार निधीतून निधीही उपलब्ध करून दिला. मला याचा आनंद असल्याचेही फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news