पिंपरी : शहरातील चौक, रस्ते होणार चकाचक | पुढारी

पिंपरी : शहरातील चौक, रस्ते होणार चकाचक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहर सौंदर्यीकरणाची कामे वेगात सुरू आहेत. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, उड्डाणपूल, इमारती सुशोभित करण्यात येत आहेत. त्यामुळे काही रस्ते व चौक आकर्षक दिसत असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला आहे.

शहरातील राजीव गांधी पुल परिसर, सांगवी फाटा, रक्षक चौक, साई चौक जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल चौक, मुकाई चौक, भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन चौक, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, नाशिक फाटा चौक, घरकुल चौक, स्पाईन रोड या ठिकाणी कार्बिंग दुरुस्ती, आकर्षक रंगरंगोटी, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु असून येथे दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. पेव्हिंग ब्लॉक बसविणे, झाडांना ओटे बांधणे, पार्किंग डांबरीकरण, 8 क्रमांक आकर्षक खांबे, 10 क्रमांक एलईडी रोषणाई अशी विविध कामे सुरु आहेत. यापैकी अनेक ठिकाणचे कामे पूर्ण झाली आहेत.

पालिका भवन, चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, प्राधिकरणातील ग .दि. माडगुळकर नाट्यगृहाची रंगरंगोटी, आकर्षक रोषणाई, बोलार्ड व आधुनिक साऊंड सिस्टीम आदी व्यवस्था करण्यात येत आहे. डांबरीकरण व रोड मार्किंग, पादचारी मार्ग तयार करणे, इमारतीच्या मागील बाजूस बॅक फिलिंग करून रस्ता करणे, दिशादर्शक फलक लावणे अशी कामे सुरु आहेत.

निगडी दापोडी रस्ता, सांगवी किवळे रस्ता, राजमाता जिजाऊ उड्डाणपुल, केएसबी चौक, मदर तेरेसा उड्डाणपुल, बर्ड वली, दुर्गादेवी टेकडी तळे, बेस्ट फ—ॉम वेस्ट मधील शिल्पे, मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते, 8 टू 80 पार्क, शहीद कामटे उद्यान, अटल बिहारी वाजपेयी उद्यान, मधुकरराव पवळे उड्डाणपूल आदी ठिकाणी सुशोभित रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच विविध इमारतींच्या ठिकाणी आकर्षक कुंड्यांची मांडणी करून सुशोभिकरण करण्याचे काम सुरु आहे. निगडी ते दापोडी रस्त्याच्या ठिकाणी रस्ते दुभाजक दुरुस्त करून रोपांची लागवड करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या ठिकाणी म्युरल्स व आकर्षक पेंटिंग तसेच, अर्बन स्ट्रीट डिझाईन यानुसार कामे करण्यात आली आहेत.

थेरगाव रुग्णालयाच्या भिंतीवर आकर्षक रंगकाम करणे, केसपेपर, मेडिकल स्टोअर-रेलिंग करणे, प्रत्येक मजल्यावर दिशादर्शक व फ्लोअर प्लान लावणे, रुग्णालयाच्या समोरील सिमाभिंतीवर रंगरंगोटी करणे, हर्बल गार्डन, व्हर्टीकल गार्डन, टेरेस गार्डन तयार करण्याचे काम सुरु आहे.

पालिका करीत आहे ही कामे…

या स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख चौक, प्रमुख इमारती व रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, तलाव, जलाशये, शिल्प, कारंजे, प्रमुख वारसा स्थळ यांचे सुशोभीकरण करण्यात येते आहे. प्रमुख ठिकाणी एलईडी प्रकाश योजना व रोषणाई करण्यात येत आहे. झोपडपट्टी व गावठाण परिसराची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, शहर कचरामुक्त करणे, ओला व सुका कचर्‍याचे विलगीकरण, प्लास्टिक बंदी, स्वच्छता कर्मचार्‍यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, नाविन्यपूर्ण योजना राबविणे, कचरा मुक्त वॉर्ड, रस्त्यांची सफाई, कचरा कुंडीमुक्त वॉर्ड, नेहमी कचरा दिसणार्‍या ठिकाणचे सुशोभीकरण करणे आदी कामे केली जात आहेत.

डिसेंबरपर्यंत शहराचे रूप पालटणार

राज्य शासनाच्या या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ करून सजविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकार्‍यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्या नुसार कामे सुरू आहेत. ही सर्व कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे,
असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Back to top button