ऊस वाहतूकदार आणि ट्रॅक्टर चालकांना खास वॉर्निंग ! काष्टीतील हटके बॅनरची सर्वत्र चर्चा | पुढारी

ऊस वाहतूकदार आणि ट्रॅक्टर चालकांना खास वॉर्निंग ! काष्टीतील हटके बॅनरची सर्वत्र चर्चा

अक्षय मंडलिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : काष्टी गावातील ग्रामस्थांनी एक अनोखी शक्कल लढवत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना बॅनरबाजी करत थेट इशारा दिला आहे. या बॅनर वरच्या संदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्रच ऊस तोडणीचे कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा जनजागृती केली जाते. मात्र, तरीही ट्रॅक्टर चालक आणि मालक याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन प्रवास करत असताना अनेकदा इतर वाहन चालकांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा अंदाज येत नसल्याने सतत अपघात घडतात.

काही दिवसापूर्वी दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावर १४ नोव्हेंबरला रात्रीच्या वेळी ट्रॉलीला दुचाकी पाठीमागून धडकल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी वारुळवाडी-सावरगाव रस्त्यावर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर आपणच आपल्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची सल मनात ठेवून तिच्या पतीनेही आयुष्य संपवलं. या सर्व घटनांची दखल घेत काष्टी गावातील ग्रामस्थांनी एक शक्कल लढवत ट्रॅक्टर चालकांना बॅनरबाजी करत थेट इशारा दिला आहे. या बॅनरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

या बॅनरवर सर्व ऊस वाहतूकदार व ट्रॅक्टर चालकांना वॉर्निंग, वॉर्निंग, वार्निंग म्हणत थेट इशारा दिला आहे. बॅनरवर पुढे म्हटले आहे की, टेप रेकॉर्डर चालू असणे, रिप्लेक्टर व रेडियम पडदा, इंडिकेटर नसणे, फास्ट स्पीड, सिंगल हेड लाईट असणे, असे ट्रॅक्टर व ट्रॉली आढळल्यास ड्रायव्हरला चोप देत दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच गावाच्या आवारात किंवा हायवेवर ट्रॅक्टर पार्क करू नये, ट्रॅक्टर कोणत्याही कारखान्याचा असला तरी त्याची परवा केली जाणार नाही. शेवटी आदेशावरून काष्टी ग्रामपंचात व समस्थ ग्रामस्थ, असेही म्हटलं आहे

Back to top button