नगर-बीड-परळी रेल्वेचे काम वेगाने पूर्ण करणार : राज्यमंत्री रावसाहेब दानवे

नगर-बीड-परळी रेल्वेचे काम वेगाने पूर्ण करणार : राज्यमंत्री रावसाहेब दानवे
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या कामांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याला यंदाच्या वर्षात 11 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दौंड ते मनमाड, नगर -बीड-परळी या मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच राज्यात रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नगर ते पुणे या डेमू रेल्वेसाठी तांत्रिक बाबींची तपासणी करुन ही रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

अहमदनगर- न्यू आष्टी या डेमूच्या अतिरिक्त सेवेचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते गुरुवारी अहमदनगर रेल्वे स्थानक येथे हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील, बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार बबनराव पाचपुते, आष्टीचे आमदार सुरेश धस, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अलोक सिंग, निरज दोहरे, अरुण मुंडे, भैय्या गंधे हे उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून नगर-बीड-परळी या मार्गाला मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. आहे. 261 किलोमीटर असलेल्या या रेल्वे मार्गापैकी नगर ते आष्टीपर्यंतच्या 66 किलोमीटरचे काम पूर्ण केले.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, अहमदनगर वासियांना मुंबईपेक्षा पुणे शहर अधिक जवळ असुन सुलभ व कमी वेळेत पुणे येथे पोहोचण्यासाठी तसेच तरुणांना रोजगाराच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर -पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

खासदार डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या, नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग बीड जिल्हा वासियांसाठी अत्यंत जिव्हाळयाचा मार्ग आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रगती पोर्टलवर हा प्रकल्प घेऊन तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र व राज्य शासनाने या मार्गासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन दिल्याने अहमदनगर ते आष्टीपर्यंतचा मार्ग पुर्ण करण्यात आला असल्याचे सांगत आष्टी ते परळी व नगर ते मुंबईपर्यंत रेल्वेची सेवा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बैठकीत रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

आष्टी ते पुणे रेल्वे गाडी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 23 डिसेंबरपर्यंत बीडपर्यंत रेल्वे नेण्याचा मानस रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील रेल्वे समस्यांचा आढावा घेतला. नगर-मनमाड दुहेरी काम सुरु केले होते. त्यासाठी ब्लॉक केले होते. मात्र, नागरिकांनी ओरड केली. त्यामुळे दुहेरीकरणाचे काम थांबले होते. आता ते लवकरच सुरु करणार आहे. दुहेरीकरणाचे काम सुरु असताना चार्‍या बुजविल्या गेल्या. तो प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. विळदघाटात नॅशनल हायवेच्या बायपासचे काम सुरु आहे. त्यांना रेल्वेची मोकळी जागा वारपरण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यासंदर्भात रेल्वे अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. शेतीमालासाठी स्वतंत्र मालधक्का नसतो. मात्र, शेतीमालाच्या वाहतुकीस प्राधान्य देण्यात येईल.

भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी फिरविली पाठ

भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी नगरसेवक सचिन पारखी यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रेल्वेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. तसेच दानवे यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत देखील त्यांनी उपस्थिती लावली. रेल्वेच्या कार्यक्रमास रेल्वेने आम्हाला बोलावलेच नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news