बोटा : अंभोरे घाटात चोरट्यांची दहशत ; घाटमाथ्यावर चोरट्यांचा अड्डा | पुढारी

बोटा : अंभोरे घाटात चोरट्यांची दहशत ; घाटमाथ्यावर चोरट्यांचा अड्डा

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अंभोरे गावापासून रणखांब व पिंपळगाव देपा दरम्यानच्या दोन्ही घाटात चोरांनी आपला अड्डाच बनवीला आहे. या घाट माथ्यावरील रस्त्याने ये-जा करणार्‍या अनेक प्रवाशांना गाठून लूटमार करून गंभीर दुखापत केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. या प्रकारांनी या घाट माथ्यावरील परिसरात चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला असल्याने अंभोरे, पिंपळगाव देपा, रणखांब परिसरात चोरांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपुर्वी पिंपळगाव देपा ते अंभोरे घाटाच्या दरम्यान छिन्नविछिन्न अवस्थेत एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. यात काही घातपात झाला असावा का? अशीही शंका आता व्यक्त होत आहे. लूटमारीच्या घटनांन मध्ये वाढ होत असल्याने प्रवासी या रस्त्यांनी प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. तर काही प्रवासी या घाट माथ्यावरील रस्त्यांनी प्रवास करणे टाळत आहे. तर अंभोरे गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महागड्या रेसिंग गाड्यांवर जाताना येतानाचे चोरट्यांचे फुटेज देखील निदर्शनास आले आहे. अंभोरे गावातून चोरट्यांनी अंभोरे गावातील मणियार व देशमुख वस्तीवर शेतकर्‍यांच्या शेळ्या पंचेचाळीस हजार रुपयांच्या पाच शेळ्या चोरल्या होत्या.

शेतकर्‍यांच्या मुत्सद्दीपणामुळे रात्री चोरीला गेलेल्या शेळ्या 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता साकुरच्या बाजारात या चोरट्यांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात आले होते. या चोरांना पकडून संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आले होते. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे तर दोघेजन सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. हे गुन्हेगार अटक झाल्यापासून अंभोरे घाट माथ्यावर चोरट्यांनी आपला अड्डाच बनविला आहे. या घाट माथ्यावर घनदाट जंगल असल्याने मोठ मोठी झाडांची दाट झाडी आहे. याचाच फायदा घेत या ठिकाणी दबा धरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एकट्या प्रवाशाला पाहुन हातात लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडसह प्राण घातक हत्यार दाखवत अडविले जाते.

 

अंभोरे गावाहून पिंपळगाव देपा तसेच रणखांब गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर दाट झाडी असलेला घाट परिसर आहे. हे चोरटे गावच्या सिसीटीव्ही फुटेजमध्ये देखील रात्री अपरात्री ये-जा करताना कैद झाले आहे. तरी पोलिस प्रशासनाने लक्ष घालून दिलासादायक कामगिरी करून या परिसराला भयमुक्त करावे, हीच मागणी.
                                                        – कोंडाजी कडनर, अंभोरे ग्रामस्थ

Back to top button