गायरानवरील कुटुंबप्रमुखांची तहसीलवर धडक ; शासनासमोर मांडली कैफीयत | पुढारी

गायरानवरील कुटुंबप्रमुखांची तहसीलवर धडक ; शासनासमोर मांडली कैफीयत

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाने उच्च न्यायालयांच्या आदेशावरून गायरान जमिनीवर वास्तव्यास असणार्‍या कुटुबांना हटाव मोहीम सुरु केल्याने आश्वी बुद्रुकच्या 40 कुटुबांचा संसार उघड्यावर पडणार असल्याने सरपंच महेश गायकवाड व उपसरपंच राहुल जर्‍हाड यांच्या नेतृत्वाखाली प्रांत, तहसिल व पंचायत समिती कार्यालयात 40 कुटुंबांच्या प्रतिनिधीनी धडक मारून आपले अश्रू मोकळे करत कैफियत मांडून निवेदन दिले. शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक 6 ऑक्टोबर 2022 च्या आदेशाप्रमाणे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम गावोगावी हाती घेतलेली असून त्याप्रमाणे अतिक्रमण माहिती संकलित करण्याचे काम गावस्तरावर जोरात सुरू झालेले आहे.

कामगार तलाठी ग्रामसेवक हे माहित्या संकलित करून सादर करीत आहेत. आश्वी बुद्रुक येथील गायरान गट नंबर 325 मध्ये जवळपास 40 कुटुंबे वास्तव्यास असून ह्या 40 कुटुंबांचा संसार आता ह्या अतिक्रमण मोहीमेमुळे उघड्यावर पडणार आहे. त्यामुळे युवानेते राहुल जर्‍हाड यांच्या नेतृत्वाखाली या 40 कुटुंबांनी थेट संगमनेर गाठत तालुका कार्यालयात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

राहुल जर्‍हाड यांच्या सोबत आज या सर्व गायरान वस्तीत राहणार्‍या कुटुंबांनी प्रांत कार्यालय तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय याठिकाणी निवेदन सादर करत अतिक्रमण मोहिमेस स्थगिती देण्याची मागणी केली. ही अतिक्रमणे गेल्या 4 पिढ्यांपासून असून आम्हास इतर कुठेही जागा नसल्याचे यावेळी सांगितले.

ही कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून त्याठिकाणी स्थायिक असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. सदर कुटुंबांना कोणताही आधार नसून त्यांना आधाराची गरय असल्याने सरकारणे ही मोहिम थांबवावी.
                                                         -राहुल जर्‍हाड, उपसरपंच, आश्वी

Back to top button