संगमनेरात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा ; 55 हजारांचे साहित्य केले जप्त | पुढारी

संगमनेरात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा ; 55 हजारांचे साहित्य केले जप्त

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने थेट संगमनेरात येवून एका हुक्का पार्लरवर छापा घातला. या कारवाईमध्ये पोलिसांनी हुक्का पिण्यात दंग असलेल्या आठ जणांसह बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालणार्‍या संतोष अशोक वांढेकर अशा एकूण 9 जणांना ताब्यात घेतले आहे. या पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी लागणार्‍या विविध साहित्यासह 11 प्रकारच्या स्वादाच्या सुगंधी तंबाखूचे डबे असा 55 हजार 750 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावरील ग्रीन लीप हॉटेल शेजारील एका पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर चालू असल्याची गुप्त खबर्‍याच्या मार्फत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरहून थेट संगमनेरात येवून ‘बेकायदेशीररित्या चालणार्‍या हुक्का पार्लवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी संगमनेर शहरातील विविध भागात राहणार्‍या उच्चभ्रू कुटुंबातील आठ तरुण वेगवेगळ्या फ्लेवरचा (चव) चा धूर करुन सिगारेटप्रमाणे ते ओढीत असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले. त्या सर्वांना आहे त्याच स्थितीमध्ये बसण्यास सांगितले.

पोलिसांनी त्या हुक्का पार्लरमध्ये 27 हजार रुपये किंमतीचे हुक्का पिण्यासाठी असणारे काचेचे व स्टीलचे भांडे, 2 हजार 600रुपये किंमतीचे 13 रबरी पाईप, 250 रुपयांचा कांडी कोळसा, अफजल कंपनीचे पानरास, ऑरेंज आणि ग्रेप्स, सुगंधी तंबाखूचे व रसायनांचे डबे, पाचशे रुपयांच्या चिलीम, हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे दोनशे रुपयांचे प्लॅस्टिकचे पाईप, तीन हजारांची वीजेरीवर चालणारी शेगडी व दोनशे रुपयांची सिल्व्हर कॉईलचा बंडल असा एकूण 55 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिस नाईक शंकर चौधरी यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियमानुसार बेकायदा हुक्का पार्लर चालविणार्‍या संतोष अशोक वांढेकर (वय 34, रा.लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी) याच्यासह प्रतिष्ठीत कुटुंबातील 22 ते 36 वर्षीय तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पार्लरमध्ये सापडलेल्या मुलांची कानउघाडणी

पोलिसांनी सर्व तरुणांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्यासमोरच हुक्का पार्लरमध्ये सापडलेल्या तरुणांची चांगलीच कान उघडणी केली. नंतर त्या सर्वांची जामीनावर सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेले बहुतांशी तरुण उच्चशिक्षित व संगमनेरातील प्रतिथयश व्यापार्यांची मुले असल्याची सुद्धा उघड झाले आहे.

Back to top button