राहुरी शहरातील अतिक्रमणे हटविली | पुढारी

राहुरी शहरातील अतिक्रमणे हटविली

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी नगरपरिषदेकडून शहरात जेसीबीच्या सहायाने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनामध्ये पालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी नवी पेठ, शुक्लेश्वर चौक, महाविद्यालय रोड, प्रगती विद्यालय, शिवाजी चौक परिसरातील छोट्या दुकानदारांची सुमारे 18 दुकाने उखाडून टाकली. नियमितप्रमाणे अतिक्रमण हटाव मोहिम फार्स ठरणार? की शहरातील अंतर्गत रस्ते मोकळा श्वास घेणार? हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. बांगर यांच्या मार्गदर्शनामध्ये काही दिवसांपूर्वीच ठिकठिकाणी अनाधिकृतपणे लावलेले बॅनर्स, होल्डींग व फ्लेक्स हटविण्यात आले होते.

शहराला विद्रूप करणार्‍या फ्लेक्सचा बंदोबस्त झाल्यानंतर पालिकेने दोन दिवसांपूर्वीच अतिक्रमीत दुकानदारांना आपले अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला होता. परंतु पालिकेया तोंडी आदेशाला धुडकावत अतिक्रमण धारकांनी रस्त्यावरील दुकाने थाटात ठेवली होती.
अखेरीस मुख्याधिकारी डॉ. बांगर यांच्या आदेशानुसार नगररचनाकार सुरेंद्र आंधळे, प्रशासकीय अधिकारी विकास घटकांबळे, पथक प्रमुख करनिरीक्षक महेंद्र तापकीरे, लिपिक भाऊसाहेब ढोकणे, आप्पासाहेब तनपुरे, रविंद्र सरोदे, राजू शेख, राजेंद्र सरोदे, भाऊसाहेब हराळे, गणेश फुगारे, भाऊसाहेब हिंगे, राजकुमार खंगले आदींचे पथक भल्या सकाळीच जेसीबी घेऊन शहरात दाखल झाले. शहरातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तत्काळ सामान हटविण्याचे आदेश देण्यात आले.

अखेरीस जेसीबीसह आलेल्या पथकाला पाहून दुकानदारांची चांगलीच भंबेरी उडाली. अनेकांनी दुकानातील सामान काढून घेत अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रतिसाद दिला. पथकाने जेसीबीद्वारे छोट्या दुकानदारांनी उभारलेले छोटे पाल उखाडून टाकले. फळ विक्रेते, चहा, कपडे, भाजीपाला विक्रेते,चपला दुकानदारांवर कारवाई होऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. नवी पेठ येथून कारवाईला प्रारंभ झाला. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये छोट्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.

सकाळी 10 वाजेपासून ते 2.30 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. जुन्या ग्रामिण रुग्णालयाच्या भिंतीलगत अनेकांनी अतिक्रमण केली होती. ती अतिक्रमणे उद्ध्वस्त झाली. प्रगती विद्यालय समोरील चायनीज दुकान व इतर दुकानांचे पाल हटविण्यात आले. विद्यामंदिर परिसर, प्रगती विद्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.

सरसकट अतिक्रमणे काढणार : डॉ. बांगर

राहुरी शहरामध्ये धनदांडग्यांच्या अतिक्रमणाकडे लक्ष दिले जात नसल्याची चर्चा आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी सांगितले की, तक्रारी वाढल्याने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
छोटे व्यापरी असो की मोठे उद्योजक, कोणीही शासकीय जागेवर अतिक्रमण करू नये. अन्यथा पालिका त्यावर कारवाई करणारच, असा इशारा डॉ. बांगर यांनी दिला आहे.

Back to top button