पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा? जि. प. अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्याकडून दर्जा तपासणीचे आदेश | पुढारी

पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा? जि. प. अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्याकडून दर्जा तपासणीचे आदेश

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील पानंद रस्त्यांची कामे काही ठिकाणी निकृष्ट झाली, तर काही ठिकाणी कामे न करताच बिले काढल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत. जामखेड तालुक्यातील अशाच दोन तक्रारींची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित कामांची तपासणी करावी, असे आदेश गुणवत्ता निरीक्षकांना त्यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजले. साकत येथील मातोश्री शेत पानंद रस्ते योजने अंतर्गत साकत स्मशानभूमी ते पिंपळवाडी रस्त्याबाबत महादेव लक्ष्मण वराट यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती.

या संदर्भात चौकशीसाठी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या तक्रारीची दखल घेताना अतिरिक्त सीईओ लांगोरे यांनी जामखेड विभागाचे गुणवत्ता निरीक्षक ए.बी. कुबरे यांना संबंधित रस्त्याची तपासणी करून 28 तारखेच्या आत आपला स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या आहेत. तर, जामखेड तालुक्यातीलच घोडेगाव येथील बेंदर ते शिवरस्ता व तळेगाव वस्ती ते खांडवी या पानंद रस्त्यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्रभू नवनाथ गवळी यांनी केली होती. याबाबतही लांगोरे यांनी गुणवत्ता निरीक्षक कुबरे यांना चौकशीचे आदेश केले आहेत.

‘कर्जत-जामखेड’ राज्यात चर्चेत!
कर्जत जामखेडमधील जलजीवन मिशनची कामे असतील किंवा, रस्त्यांची कामे, याबाबतीत आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यातील संघर्ष राज्यात चर्चेत आहे. काही कामांसंदर्भात तर आमदार शिंदे यांनी तारांकित प्रश्नही उपस्थित केलेले आहेत. त्यामुळेच आता या चौकशीलाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात कर्जत-जामखेडमधून आणखी तक्रारी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

काम न करता बिले काढली; अहवालात स्पष्ट!
साकत स्मशानभूमी ते पिंपळवाडी रस्त्याबाबत काम दिसून येत नाही, दोन्ही बाजूला नाल्याही दिसून येत नाहीत, रस्त्यावर मुरुमही दिसून येत नाही, काम झालेल्या ठिकाणी काहीही खुणा नाहीत, काम अगोदर केले असेल व तांत्रिक कारणास्तव बिल उशिरा म्हणजेच यावर्षी अदा केले असेल तर, याबाबत उपअभियंता यांनी तसे खुलाशात किंवा बिल मंजूर करताना नमूद करणे आवश्यक होते.
परंतु, तसे केलेले दिसत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष काम न करता रस्त्याचे बिल अदा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा अहवाल तहसीलदारांनी दिल्याचे काल कार्यकारी अभियंता उराडे यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती महादेव वराट यांनी दिली.

Back to top button