ताजनापूर टप्पा दोनचे काम लवकरच : आमदार मोनिका राजळे | पुढारी

ताजनापूर टप्पा दोनचे काम लवकरच : आमदार मोनिका राजळे

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : ताजनापूर टप्पा क्रमांक दोनचे काम लवकरच पूर्ण होणार असून, आठवडाभरात रस्त्यांची कामे सुरू होणार असल्याचे आश्वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले. आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शेवगाव तालुक्यातील खामपिंप्री येथील हनुमान मंदिरासमोर 15 लाख रुपये किंमतीचा सभामंडप, कोळगाव व हसनापूर येथे प्रत्येकी 10 लाख रुपये किंमतीचे सभामंडपाचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार राजळे म्हणाल्या, ताजनापूर सिंचन योजना कामाचे 108 कोटींचे टेंडर झाले असून, यावर्षी 13 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे. आतापर्यंत या योजनेचे वितरण कुंडापर्यंतची सर्व कामे झाली आहेत. आता, शेतकर्‍यांच्या शेतापर्यंतच्या पाईपलाईनची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर मिरी-शेवगाव, शेवगाव-पैठण, शेवगाव-गेवराई, शेवगाव-तिसगाव या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, आठवडाभरात ही कामे सुरू होतील. भाजपा-सेना युतीच्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये मोठा विकास निधी आणला; परंतु महाविकास आघाडीच्या कालावधीत पुरेसा निधी न आल्याने विकासकामांना खिळ बसली. परंतु, पुन्हा राज्यात आपले सरकार आल्याने मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागणार आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, मारुती महाराज झिर्पे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, सुनील रासने यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महिला तालुकाध्यक्षा आशा गरड, सरचिटणीस भीमराज सागडे, राजेंद्र डमाळे, बाबासाहेब किलबिले, संजय खेडकर, संभाजी कातकडे, साईनाथ झिर्पे, सुरेश नेमाणे, बाळासाहेब झिर्पे, शोभा ढाकणे, लक्ष्मण इसारवाडे, अनिता उंदरे, गणेश ढाकणे, नवनाथ ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक आदी उपस्थित होते.

Back to top button