राहुरी : राजमाताच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करा ; ठेवीदारांची पत्रकार परिषदेत मागणी

राहुरी : राजमाताच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करा ; ठेवीदारांची पत्रकार परिषदेत मागणी
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये 7 कोटी 37 लक्ष 62 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी केवळ अध्यक्ष, उपाध्यक्ष व मॅनेजर यांसह तत्कालिन वैधानिक लेखा परिक्षकांसह नऊ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. परंतु अपहार करताना सर्व संचालकांनी भ्रष्टाचारी कारभाराला मुकसंमती देत पाठबळ दिले आहे. त्यामुळे सहायक निबंधक व पोलिस प्रशासनाने सर्व संचालकांना जबाबदार मानत त्यांनाही अपहार गुन्ह्यामध्ये सहभागी करावे व ठेवीदारांची ठेव लवकरात लवकर अदा करावी ,अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

राहुरी शहरामध्ये राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या सर्व ठेवीदारांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. याप्रमध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले कुमार डावखर, सुरेश कोकाटे, जगन्नाथ घाडगे, काका कुलकर्णी, कल्याण राऊत, ज्ञानदेव जाधव, अशोक वराळे, गोरख औटी, सुनिल भुजाडी, नागेश पानसरे, राजेंद्र पागिरे, पारस जैन, राजेंद्र जाधव, मयुर धोंडे, वनिता जाधव, आयेशा शेख, सुयोग सरोदे, डोके सर, रामेश्वर केतके आदींची उपस्थिती होती.

ठेवीदारांनी सांगितले की, राजमाता पतसंस्थेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी, पत्रकार, अभियंता, माजी नगरसेवक, आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक असे महत्वाचे उच्च पदस्थ व्यक्ती संचालक म्हणून कार्यरत होते. संबंधितांच्या कामकाजावर विश्वास ठेवून राजमाता पतसंस्थेमध्ये ठेवीदारांनी आपले पैसे गुंतविले. पतसंस्थेच्या कामकाजामध्ये शासकीय लेखापरीक्षणामध्ये मॅनेजर फाटक याने कर्जाची अफरातफर केली. स्वतःच्या नावे कर्ज म्हणून पैसे वापरले. हे सर्व घडत असताना सर्व संचालक मंडळ मासिक बैठकीत फाटक याच्या गैरकारभाराला एकप्रकारे संमती देत असल्यानेच गैरव्यवहार होऊन पैशांचा अपहार झाला.

याप्रमाणे संबंधित पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कर्मचारी, वैधानिक लेखापरीक्षकांसह गुन्हे दाखल करावेत.

मॅनेजरला संचालकांची मुक संमती

6 हजार वेतन व केवळ 1 एकर क्षेत्र असलेल्या फाटक या मॅनेजरला लाखो रुपयांचे कर्ज देताना संचालक मंडळाने विरोध केेला नाही. दरम्यान, संचालक मंडळापैकी केवळ अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचाच गुन्ह्यात समावेश झाल्याने ठेवीदारांची ठेव मिळण्यास अडथळा होणार आहे. गुन्ह्यात सहभागी असणार्‍या इतर संचालकांवरही गुन्हे दाखल होऊन ठेव मिळण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news