खेड : पुलासाठी दोन कोटी 79 लाखांचा निधी; विद्यार्थी, नागरिकांनी मानले आभार | पुढारी

खेड : पुलासाठी दोन कोटी 79 लाखांचा निधी; विद्यार्थी, नागरिकांनी मानले आभार

विजय सोनवणे

खेड : ‘अनेक लोकप्रतिनिधी अन् मंत्रिमंडळातील पदे लाभलेला कर्जत-जामखेड मतदारसंघ…तरीही इथल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा अजूनही छातीइतक्या पाण्याशी संघर्ष…कधी पालकांच्या खांद्यावर, तर कधी तराफ्यात बसून काढलेला मार्ग!  कदाचित आपल्याला ही जणू दुर्गम भागातील परिस्थिती वाटेल; पण तसं बिलकुल नाही. ही आहे कर्जत-जामखेड मतदारसंघातील आखोणी गावाच्या हद्दीतील खैदानवाडी इथल्या बेलवरा ओढ्यावरील परिस्थिती.

आजपर्यंत होऊन गेलेल्या अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींना इथल्या पुलासाठी नागरिकांनी मागणी केली; मात्र विद्यार्थ्यांचे हाल समजून घेतील ते नेते मंत्री कसले? मात्र, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाची दखल अखेर आमदार रोहित पवार यांनी घेतली आणि या ठिकाणी नाबार्डमधून तब्बल दोन कोटी 79 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. आता, लवकरच या ठिकाणी पुलाची उभारणी होणार असून, विद्यार्थी पालकांना कायमचा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मागणीला न्याय मिळाल्याने विद्यार्थ्यांची शाळेसाठी असलेली वाट आता मोकळी होणार आहे.इथल्या ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवारांचे आभार मानले.

यावेळी आखोणी गावचे सरपंच सचिन चव्हाण, उपसरपंच संतोष सायकर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र भांडवलकर, पंचायत समिती माजी सदस्य मारुती सायकर, भगवान भांडवलकर, पोलिस पाटील दशरथ सायकर, संतोष भांडवलकर, अमोल काकडे, माणिक शिंदे, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.?

खैदानवाडी इथल्या मुलांना अनेक वर्ष पालकांच्या खांद्यावर बसून छातीइतक्या पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावं लागायचे; परंतु आजवरच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिलले नाही. अखेर इथे पूल बांधण्याची संधी मला मिळाली, हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठीही माझा प्रयत्न राहणार आहे.
                                                                           -रोहित पवार, आमदार

Back to top button