वाळकी : पाळीव जनावरे चोरांचा तालुक्यात धुमाकूळ; शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण | पुढारी

वाळकी : पाळीव जनावरे चोरांचा तालुक्यात धुमाकूळ; शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात पाळीव जनावरे चोरणार्‍या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. गेल्या 2-3 महिन्यांत अनेक शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या, संकरित गायी, खिलार बैलांच्या चोर्‍या झाल्या. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर राहणार्‍या शेतकर्‍यांच्या झोपा उडाल्या आहेत. चोरट्यांच्या भीतीने रात्र जागून काढावी लागत आहे.

तालुक्यातील गुंडेगाव येथे 4 बोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.12) पहाटे घडली. शेतकरी मल्हारी कोतकर यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून घरीच शेळीपालन केले आहे. शुक्रवारी (दि.11) रात्री मल्हारी कोतकर यांनी घरातील शेळ्यांना चारा टाकला अन् झोपी गेले.

त्यानंतर रात्री अन्य जनावरांच्या चारा टाकण्यासाठी ते उठले असता, लहान करडांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याने ते शेळीच्या गोठ्याकडे गेले. गोठ्यातील काही शेळ्या त्यांना न दिसल्यामुळे त्यांनी आसपास अन् शेतात जावून शेळ्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांना शेळ्या काही मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी ते परत आले. गोठ्यात बांधलेल्या शेळ्या मोजल्या.

त्यापैकी 4 बोकड कमी भरल्याने ते चारही बोकड चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचे सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी (दि.13) रात्री 12 वाजता अकोळनेर, सारोळा कासार, भोरवाडी, खडकी, घोसपुरी परिसरात एक विनाक्रमांकाचा पिकअप आणि एक मारुती कार संशयास्पद फिरत असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सर्व गावांमध्ये संपर्क करून ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे ग्रामस्थांना सावध करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या भागात नाकेबंदी केली. गस्त घातली मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने चोरट्यांनी पलायन केले.

Back to top button