पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली | पुढारी

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे  याची बदली झाली आहे. त्यांची बदली जळगाव येथे झाली आहे. जळगाव येथे संजय गांधी निराधार योजनेचा पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे चर्चेत आल्या होत्या. क्लीपमध्ये लोकप्रतिनिधींच्या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा उल्लेख होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. क्लीपमध्ये कुणाचाही उल्लेख नसला तरी तो रोख आमदार निलेश लंके यांच्या दिशेने असल्याचे बोलले जाते.

काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्त मुंबई यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही माहिती अँड.असीम सरोदे यांनी दिली. तक्रारदार राहुल झावरे यांच्यामार्फत देवरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

वाळूचे ठेके व दंड सरकारकडे जमा न केल्याचा ठपका देवरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकायुक्त नियुक्त झाल्यानंतर ही पहिली तक्रार दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातच ही तक्रार दाखल झाली आहे. देवरे यांनी प्रांताच्या अधिकार वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

ज्योती देवरे यांच्या बाजूने उभे राहण्यावरून महसूल कर्मचाऱ्यांमध्ये देखील फूट पडली होती. दरम्यान, तहसीलदार देवरे यांची अखेर बदली झाली असून जळगाव संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार पदाचा कार्यभार त्यांना सोपविण्यात आला आहे.

Back to top button