घारगाव परिसरात विजेचा लपंडाव, वीज चोरी कारवाईत महावितरण अधिकाऱ्यांचे हात वर | पुढारी

घारगाव परिसरात विजेचा लपंडाव, वीज चोरी कारवाईत महावितरण अधिकाऱ्यांचे हात वर

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील महावितरण कंपनीच्या सबस्टेशन अंतर्गत येणार्‍या गावांमध्ये विजेच्या चोरीमुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. वारंवार मोर्चा आंदोलने करून देखील वीज पुरवठा सुरळीत होत नाही. याउलट शेतकर्‍यांना सुरळीत विद्युत पुरवठा पाहिजे, असेल तर अवैध वीज उपकरणे वापरणे तसेच वीज चोरी बंद करा, असे आवाहन करत महावितरण कंपनीकडून कारवाई करण्यास हात वर केले आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली 7 नोव्हेंबर रोजी घारगाव सबस्टेशन समोर शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले होते. विजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.

साकुरचे सहाय्यक अभियंता समाधान घुगे यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन विजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर देखील वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने 11 नोव्हेंबर रोजी महावितरण कंपनीच्या घारगाव येथील कार्यालयाला शेतकर्‍यांनी पुन्हा घेराव घातला. यावेळी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी शेतकर्‍यांना आव्हान केले की, आपणास सुरळीत विद्युत पुरवठा पाहिजे असल्यास सामाजिक भान ठेऊन घरातील अवैध उपकरणे वापरणे तसेच वीज चोरी करणे बंद करा, असे आवाहन केले आहे.

घारगाव महावितरण कंपनीच्या सबस्टेशन अर्तर्गत ग्रामीण भाग असल्याने वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यात काही ठिकाणी दिवसा ढवळ्या आकडे टाकून वीज वापरली जाते. सिंगल फेजवर मोटारी चालविणे बेकायदेशीर असताना राजरोसपणे मोटारी मोटारी चालवल्या जात आहे. घरातील वीज कनेक्शनमध्ये विविध क्लृप्त्या वापरून अवैधरित्या विविध विद्युत उपकरणे वापरले जात आहे. ज्यांचेकडे कुठल्याही प्रकारचे मीटर नाही. अशा घरांमध्ये देखील रात्रीच्या वेळेस आकडे टाकून विजेचा लखलखाट दिसून येत आहे. मात्र महावितरण कंपनीकडून कारवाई शुन्य दिसून येत असल्याने यात काही गौड बंगाल आहे की काय? असाही प्रश्न कायदेशीर बिल भरणार्‍या ग्राहकांना पडत आहे. याची त्रास कायदेशीर वीज ग्राहकांना सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

Back to top button