शेतीच्या बांधावरच शेतीमालाची खरेदी सुरू ; शेतकर्‍यांचा दुहेरी फायदा | पुढारी

शेतीच्या बांधावरच शेतीमालाची खरेदी सुरू ; शेतकर्‍यांचा दुहेरी फायदा

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  यावर्षी सूर्यफूल, कापूस, कांदा पिकांना चांगला दर मिळत असल्याने शेतात तयार शेतीमालाला बांधावरच व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यासाठी गुंडेगाव येथील संपूर्ण शेतकरी समूह गट व कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. सोलापूर,पुणे, नाशिक,नगर येथील व्यापारी गुंडेगाव परिसरात शेतीमाल खरेदीसाठी येत आहेत. शेतीच्या बांधावरच व्यापार्‍यां कडून मालाची खरेदी सुरू झाल्याने काढणीसाठी व वाहतुकीसाठीच्या खर्चाची बचत होऊन शेतकर्‍यांचा दुहेरी फायदा होत आहे.
दरवर्षी पिके तयार झाल्यावर विक्रीसाठी अडचण निर्माण होते.

यावर्षी सुद्धा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खर्चही मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे सध्या शेतपिकांना सरासरी चांगला बाजारभाव मिळत आहे. परिसरात सूर्यफुलाचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुंडेगाव परिसरासह नगर तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापारी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर येऊन खरेदी करीत आहेत. गावातच खरेदी करून हे व्यापारी थेट बाजारपेठेतच आपला माल विक्रीसाठी पाठवत आहेत. शेतातच पैसा मिळत असल्याने उत्पादक शेतकरी खूश आहेत.

गुंडेगाव व परिसरातील हिरवेगार शेती, खळखळणारे पाणी लक्ष वेधून घेत आहेत. गावातील सेंद्रिय शेतीचे जनक व संपूर्ण शेतकरी शेती समूहाचे अध्यक्ष संतोष भापकर व ज्योती भापकर यांच्या प्रयत्नाने गुंडेगावमध्ये व्यापारी दाखल होऊ लागले आहेत. संतोष भापकर यांनी गावासह परिसरातून शेतमाल खरेदी करून पुणे, मुंबई या ठिकाणी शेतकरी ते ग्राहक माल पाठवू लागले आहेत. स्थानिक सात ते आठ तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

हे तरुण शेतातून चांगल्या प्रतीचा माल खरेदी करून सामान्य ग्राहकास ताजा भाजीपाला पाठवत आहेत. बाहेरील व्यापारी शेतीमाल स्थानिक मजूर लावून भरून नेतो. काढणी, गोणीत भराई, त्यांनतर ट्रॅक्टरमधून ट्रकमध्ये भराई या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागत असल्याने स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मालाचे वजन केल्याबरोबर शेतकर्‍यांच्या हातात पैसा मिळत असल्याने शेतमालावर फुलणारा हा शेताच्या बांधावरील बाजार सध्या शेतकर्‍यांच्या सोयीचा व सुखाचा ठरत आहे.

Back to top button