पाथर्डीमध्ये 60 लाखांचा मुद्देमाल जप्त, हनुमान टाकळीमध्ये तिघा वाळू तस्करांवर कारवाई | पुढारी

पाथर्डीमध्ये 60 लाखांचा मुद्देमाल जप्त, हनुमान टाकळीमध्ये तिघा वाळू तस्करांवर कारवाई

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील हनुमान टाकळी येथील नानी नदीपात्रातील गौण खनिजाची चोरी करून वाहतूक करणार्‍या तस्करांवर महसूल आणि पोलिसांनी कडक कारवाई करत सुमारे 20 लाख रुपये किमतीची वाहने जप्त केली. दुसर्‍या कारवाईमध्ये चितळी-साकेगाव रस्ता परिसरात जिल्हाधिकार्‍यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
हनुमान टाकळीत नानी नदीपात्रात बेकायदा शासनाच्या मालकीची वाळू चोरी होत असल्याची महिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिस पथकाने रविवारी दुपारी छापा टाकून नदीपात्रातून एक जेसीबी, एक ट्रॅक्टर असा एकूण वीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाळू चोरीसह पर्यावरण संरक्षण अधिनियम या कलमान्वये पोलिस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासळकर यांनी फिर्याद दिली. यावरून पाथर्डी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हवालदार दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, संभाजी कोतकर, विनोद मासळकर यांनी केलेल्या कारवाईत बंडू शिवाजी बर्डे (वय 36, रा हनुमान टाकळी), अक्षय दत्तात्रय मरकड (वय 20, रा निवडुंगे), दिलीप शिवाजी वाढेकर (वय 32, रा जोडमोहोज ता.पाथर्डी) यांना आरोपी केले.

मासळकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, हनुमान टाकळीतील नानी नदीत बंडू बर्डे हा बेकायदा वाळू चोरून ट्रॅक्टरमध्ये भरून तिची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नानी नदीपात्रात तिघे एका जेसीबीच्या साह्याने वाळू काढून ती एका ट्रॅक्टरमध्ये भरताना दिसले. तेव्हा आम्ही दुपारी दीड वाजता छापा टाकून जेसीबी, ट्रॅक्टर चालक व मालक यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांचेकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस केली. त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यावेळी बंडू बर्डे, अक्षय मरकड, दिलीप वाढेकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एक जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान वाळू तस्करी विरोधात महसूल विभागाने कारवाईची मोहीम उघडल्याने तालुक्यातील तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

गौण खनिज तस्करांचे दणाणले धाबे
दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या गौण खनिज पथकाने तालुक्यातील साकेगाव-चितळी रस्ता परिसरात छापा टाकून मुरूम वाहतूक करणार्‍या एक जीसीबी, चार ट्रॅक्टर आणि दोन डंपर असा अंदाजे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाला शुक्रवारी बेकायदा मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने छापा टाकून कारवाई केली. दंडाच्या कारवाईसाठी पथकाने पाथर्डी तहसील कार्यालयाकडे कागदपत्रे दिली असून पुढील दंडाची कार्यवाही तहसील विभागाकडून होणार आहे. प्रशासनाने आता कडक मोहीम हाती घेऊन कारवाईचे पाऊले उचलली आहेत. त्यामुळे गौण खनिजची चोरी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Back to top button