बारागाव नांदूर पाणी योजनेचे ग्रहण सुटेना! ‘महावितरण’कडून वीजपुरवठा खंडित

बारागाव नांदूर पाणी योजनेचे ग्रहण सुटेना! ‘महावितरण’कडून वीजपुरवठा खंडित
Published on
Updated on

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राज्याला आदर्श ठरलेल्या 'बारागाव नांदूर' प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला गेल्या वर्षभरापासून ग्रहण लागले आहे. कधी पाईप लाईन फुटल्याने, वीज पुरवठा खंडित झाल्याने किंवा थकीत वसुलीसाठी अशा कोणत्या न कोणत्या कारणास्तव बंद राहणार्‍या या पाणी योजनेचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. दरम्यान, महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणी पुरवठा बंद झाल्याने संबंधित 15 गावांची पाण्यासाठी होरपळ सुरू झाली आहे.

बारागाव नांदूर पाणी योजनेवर बारागाव नांदूरसह डिग्रस, राहुरी खुर्द, केदळ खुर्द, केंदळ बु., मांजरी, मानोरी, वळण, तांदूळवाडी, आरडगाव, शिलेगाव, तमनर आखाडा, पिंप्री चंडकापूर, देसवंडी आदी गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बारागाव नांदूरसह इतर 14 गावांच्या पाणी योजनेवर आधारित आहे. स्व. शिवाजी राजे गाडे यांच्या मार्गदर्शनाखालील या योजनेने राज्यात आदर्श निर्माण केला होता. नफ्यात असलेल्या या पाणी योजनेचा सन्मान राज्यस्तरावर झाला.

दरम्यान, राज्य- शासनाकडून मिळणारा देखभाल, दुरूस्तीचा निधी गेल्या 4 वर्षांपासून थकीत आहे. सुमारे 70 लक्ष रूपये शासनाकडे थकीत झाल्यानंतर कोरोना कालखंडाने योजनेच्या वसुलीला बे्रक लावले. कोरोना असल्याने लाभार्थी ग्रामस्थांकडे वसुली थकीत झाली. पाणी योजनेची मागील काळातील 44 लक्ष रूपये तर चालू वर्षाची 67 लक्ष रूपये अशी एकूण 1 कोटी 12 लक्ष रूपयांची थकबाकी वसुलीचे मोठे आव्हाण निर्माण झाले आहे.

वसुली तसेच शासकीय अनुदान निधी लाभत नसल्याने पाणी योजनेचा वीज बिल थकीताचा आकडा वाढतच चालला आहे. महातिवरण विभागाची 92 लक्ष 36 हजार 380 रूपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई झाली. दिवाळी सणातच पाणी योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनुसार 'महावितरण'ने वीज पुरवठा सुरळीत करीत दहा दिवसांची मुदत दिली होती, परंतु पाणी योजनेकडून थकीत रक्कम भरली नसल्याचे कारण देत अखेर ः'महावितरण'ने कारवाईचा फास आवळला.

पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी बंद झाले आहे. मुळा धरणावर आधारित असलेल्या बारागाव नांदूर पाणी योजनेवरील संकट गडद झाले. एकीकडे ग्रामस्थांकडून वसुली होत नसताना दुसरीकडे शासकीय अनुदान लाभेनासे झाले आहे. शासनाकडून देखभाल, दुरूस्तीसह पाणी योजनेचे अनुदान लाभत नसल्याने बारागाव नांदूर पाणी योजना पुन्हा संकटात सापडली आहे.

दरम्यान, यप्रश्नी पाणी योजनेच्या अध्यक्षा विद्याताई गाडे, सचिव ग्रामसेवक बाळासाहेब गागरे, समन्वयक शौकत इनामदार यांच्यासह सर्व सदस्यांची बैठक घेण्याचा निर्णय झाला. पाणी योजनेची थकीत वसुली, अनुदान याबाबत चर्चा होऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जि. प. सदस्य धनराज गाडे यांनी दिली.

गेल्या सहा महिन्यांपासून बारागाव नांदूर पाणी योजना या ना त्या कारणावरून बंद राहत आहे. पाणी पट्टी वसुलीसाठी पाणी योजना बंद ठेवली गेली. यानंतर मुळा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्यानंतर तब्बल 20 दिवसानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. त्यानंतर दिवाळी सणात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर पुन्हा महावितरणने वसुलीचे हत्यार उपसल्याने वीज पुरवठा कोणतीही नोटिस न पाठवता बंद झाला. परिणामी पाणी योजना पुन्हा बंद झाल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू झाली आहे.

शासनाकडून पाणी योजनांकडे पूर्णतः दुर्लक्ष
बारागाव नांदूर पाणी योजनेचे शासकीय अनुदान रखडले. सौर ऊर्जा प्रकल्पाचे नियोजनही बासनात गुंडाळले. योजनास्थळी संरक्षक भिंतीचा विसर पडला. शासनाकडून त्यासाठी निधी मिळेनासा झाला आहे. याप्रमाणे पाणी योजनांकडे शासनाने पुर्णतः दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.

पाणीपुरवठा कधी सुरू होणार..?
बारागाव नांदूर पाणी योजना लाभार्थ्यांची गेल्या वर्षभरापासून ससेहोलपट सुरू आहे. महिनाभरही सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही. कोणत्या न कोणत्या कारणास्तव बंद पडणारी बारागाव नांदूर पाणी योजना आता वीज पुरवठा खंडित केल्याने दोन दिवसांपासून बंद आहे. योजना सुरू होणार की नाही, याबाबत सर्वांचे हात कानावर जात आहेत. त्यामुळे नेमका पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news