अतिवृष्टीनंतर आता उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव | पुढारी

अतिवृष्टीनंतर आता उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

भेंडा : पुढारी वृत्तसेवा :  मागील महिन्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यानंतर अनेक पिकांचे नुकसान झालेले असतानाच, आता उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कृषी खाते किंवा साखर कारखान्याने तातडीने योग्य उपाययोजना हाती घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी ऊस उत्पादकांतून होत आहे.
पाऊस लागून राहिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, कपाशी, मका, पालेभाज्या व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई अद्यापि शेतकर्‍यांच्या पदरी पडली नसल्याने, ती किती व केव्हा मिळेल, याबाबत शेतकरी साशंक आहेत. त्यानंतर आता लोकरी मावा उसावर अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

या लोकरी माव्यावर तातडीने प्रभावी उपाययोजना न झाल्यास येणार्‍या थंडीमुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. कारण थंडीत या लोकरी मावा वाढीसाठी पोषक वातावरण असते. काही ठिकाणी फवारणी करूनही पूर्णपणे मावा नाहीसा झालेला नाही.
या मावा किडीची पिले व प्रौढ कीड पानाखाली स्थिर राहून अणकुचीदार सोंडेच्या साहाय्याने पानातील अन्नरस शोषूण घेतात. त्यामुळे पानाच्या कडा सुकतात. हा मावा पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतो. पानाच्या मागच्या बाजूस मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने एकमेकांच्या अंगावर बाल्यावस्थेत पिले बसलेली दिसतात.

कीडग्रस्त पानांवर पिवळसर ठिपके दिसतात. पहिल्या-दुसर्‍या अवस्थेत मावा पिलावर लोकर नसते. तिसर्‍या अवस्थेपासून लोकर येते. पानामधील रस शोषल्याने पाने निस्तेज होतात. या मावा किडीची विष्ठा चिकट असल्याने त्यावर काळी बुरशी वाढते. पानावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडियम या बुरशीची वाढ झाल्यामुळे हे पान काळे पडते. त्यामुळे पानाची कर्बग्रहणाची प्रक्रिया मंदावते. पानांद्वारे प्रकाश संश्लेषण थांबते. त्यामुळे उत्पनाताही काही टक्के घट येते. तसेच, फवारणीसाठी महागडी औषधे वापरावी लागतात.

 

सहा ते आठ महिन्यांपर्यंतच्या उसास एकरी 5 किलो फोरेट किंवा फ्रिप्रोनील दाणेदार वापश्यावर मातीत मिसळावे किंवा प्रवाही पाण्यातून द्यावे किंवा फवारणी करावी. जेथे फवारणी करणे शक्य नाही, तेथे ठिबकमधून उपाययोजना करावी किंवा कपडे धुण्याच्या पावडरची फवारणी केली तरी चालते.
                                                              -डॉ.अशोकराव ढगे, कृषी शास्त्रज्ञ

Back to top button