बिबट्याची छेड काढणे पडले महागात ! हल्ल्यात शेतकरी जखमी | पुढारी

बिबट्याची छेड काढणे पडले महागात ! हल्ल्यात शेतकरी जखमी

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील धनगरवाडीमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी घडली. धनगरवाडी शिवारात बिबट्या आल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. रात्रीच काही नागरिकांनी टोलनाका परिसरात बिबट्या पाहिला होता. सकाळी बिबट्या नगर- औरंगाबाद रस्त्यालगत गिन्नी गवत व झाडांच्या जाळीत बसलेला नागरिकांनी पाहिला. त्यावेळी शेतकरी रामदास मारुती गवळी ( वय 60) हे काठी घेऊन त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे चिडलेल्या बिबट्याने रामदास गवळी यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले.

गवळी यांच्या मांडीला जखम झाली आहे. सुमारे दोन वर्षांपासून जेऊर परिसरात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. बिबट्याने या परिसरात शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, गाय, घोडा या प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणात शिकार केल्या आहेत. पाळीव प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणात शिकार केल्या असल्या, तरी परिसरात अद्यापि मानवावर हल्ला केल्याची घटना घडली नव्हती. गवळी यांच्यावर झालेला हल्ला हा बिबट्याकडून मानवावर झालेल्या हल्ल्याची पहिलीच घटना आहे. ती घटना पण मानवाच्या चुकीमुळेच घडल्याचे दिसून येत आहे.

जेऊर परिसरात चोहोबाजूंनी असलेल्या डोंगररांगा बिबट्या तसेच इतर वन्य प्राण्यांसाठी पोषक ठरत आहेत. येथे वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे झालेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेतून दिसून आले आहे. डोंगररांगांनी दुर्मिळ औषधी वनस्पतींबरोबर विविध जातींचे वन्यप्राणी व पक्षी आढळून येत आहेत. जेऊर परिसरात बिबट्याचा रस्ता अपघातात मृत्यू देखील झालेला आहे. जेऊर परिसरातील चापेवाडी, इमामपूर, डोणी परिसर, गवारे वस्ती, खंडोबा माळ, माळखास, पिंपळगाव तलाव, भवानी माता मंदिर या परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य आढळून येत होते.

घटनास्थळी वनविभागाच्या वतीने उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, कर्मचारी संजय पालवे, संजय सरोदे यांनी भेट देऊन पिंजरा लावला आहे. तसेच परिसरात जनजागृती करण्यात आली. स्थानिक लोकांच्या मदतीने इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, किशोर शिकारे यांनी जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.

वन्यप्राण्यांना हाताळणे, छेडछाड करणे गुन्हा आहे. हरीण, पाडस, वानर, माकड व इतर वन्य प्राण्यांना खाण्यासाठी वस्तू देणे, त्यांना हाताळणे हा गुन्हा आहे. सर्व नागरिकांनी वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासात मुक्तपणे राहू द्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
                                                                    -श्रीराम जगताप, वनरक्षक

Back to top button