नेवासा : पुढारी वृत्तसेवा : महालक्ष्मी हिवरेचा फेर भानसहिवरे येथील जमिनीला जोडून हेराफेरीतून फेर नोंद गायब करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे वृद्ध महिलेने उतारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांना निवेदन देत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील महसूल दप्तरी झालेल्या फेरच्या हेराफेरीमुळे आशाबाई अरुण मकासरे (वय 64) यांची मालकी हक्काच्या सातबारा उतार्यावरील नोंद कमी झाली आहे. त्यामुळे पुन्हा नोंद लावून सातबारा उतार्यावरील झालेला अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी या महिलेने नेवासा तहसीलदारांना साकडे घालत अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सोमवार (दि.14) पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.
मकासरे यांची गट नंबर 141/1 क्षेत्रामधील फेर नंबर 8755 ने कायम खरेदी केलेले 50 गुंठे क्षेत्र मालकी हक्काचे झालेले आहे. या क्षेत्रात या महिलेने सन 2004 ते सन 2008 पर्यंत ऊस पीक घेतले असून, तशी नोंद साखर कारखान्याकडे आहे. या जमिनीचा करही त्यांनी भरलेला आहे. तसेच, प्रांत, जिल्हाधिकारी, नाशिक आयुक्त यांनी त्यांच्या कायम खरेदी केलेल्या जमिनाचा फेर नंबर 8755 व दस्त क्रमांक 2542 रद्दही केलेला नाही. तसेच, उपविभागिय अधिकारी यांचा आरटीएस 129/05 चा फेर क्रमांक 8866 हा महालक्ष्मी हिवरे येथील धनराज लक्ष्मण गायके यांचा आहे.
असे असताना तो फेर भानसहिवरे येथील आशाबाई मकासरे यांच्या मालकीच्या जमिनीला महसूल विभागाने हा फेर जोडून कायम खरेदीखत केलेल्या भानसहिवरे येथील जमिनीची नोंद महालक्ष्मी हिवरेचा फेर जोडून कमी केली आहे. हा आपल्यावर अन्याय असून, महसूल खात्याने झालेल्या चुकीची दुरुस्ती करून मालकी हक्काच्या जमिनीच्या सातबारा उतार्यावरील गायब केलेली नोंद पुन्हा कायम करण्यात यावी. अन्यथा सोमवार (दि.14) पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या महिलेने तहसीलदारांना निवेदनात दिला आहे.