मुळा धरणाचा विसर्ग पुन्हा सुरू; शेतकरी खुश | पुढारी

मुळा धरणाचा विसर्ग पुन्हा सुरू; शेतकरी खुश

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  मुळा धरणामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याच्या आवकेचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. चालू वर्षी धरणामध्ये एकूण 49 हजार 386 दलघफू इतके नव्याने पाणी जमा झाले. पावसाचा वर्षाव बंद झाल्यानंतरही डोंगरातून झिरपणार्‍या पाण्याने साठ्यात वाढ होत होती. अखेरीस धरणातून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला आहे. 7 नोव्हेंबरपासून 300 क्यूसेक प्रवाहाने दरवाज्यातून पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे जलस्त्रोत असलेल मुळा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली. यंदाच्या वर्षी नवीन पाण्याच्या आवकेचा उच्चांक प्रस्थापित झाला.

तब्बल 49 हजार 386 क्यूसेक इतके नव्याने पाणी मुळाला लाभले. त्यापैकी धरण साठ्यापेक्षा अधिक पाणी मुळातून जायकवाडीला सोडण्यात आले. जायकवाडी धरणाला मुळातून 27 हजार 935 दलघफू इतका पाणी साठा लाभला. 18 हजार 400 दलघफू इतके पाणी धरणात जमा असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. उजव्या कालव्यातून 3 हजार 135 दलघफू इतके तर डाव्या कालव्यातून 134 दलघफू इतके पाणी खर्च झाले. वांबोरी चारीसाठी 177 दलघफू इतके पाणी सोडण्यात आले.

याप्रमाणे मुळा धरणातही यंदा पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊन तब्बल दोन महिने विसर्ग सुरू असतानाच दिवाळी सणापूर्वी पावसाने थांबा घेतला. दिवाळी सणानंतर पावसाचा थांबा तर घटलेली आवक पाहता मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील व उपअभियंता शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये धरणाचा विसर्ग थांबविण्याचा निर्णय झाला. 72 दिवसानंतर पाणी थांबल्याने नदीपात्र स्थिरावले होते. परंतु डोंगरदर्‍यातून झिरपणार्‍या पावसाच्या पाण्याने धरण साठ्यात पुन्हा होणारी वाढ पाहता 7 नोव्हेंबर रोजी पुन्हा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

धरणाच्या दरवाजांपैकी 4,5,6,7,8 या क्रमांकाचे दरवाजे प्रत्येकी दीड इंच इतके वर उचलण्यात आले. त्यामधून 500 क्यूसेक प्रवाहाने दरवाज्यातून पाणी वाहत आहे. कोतूळ सरिता मापन केंद्र येथून 200 क्यूसेक इतर झिरपणारे पाणी पाहता विसर्ग सोडणे गरजेचे ठरले.
धरण साठा 26 हजार दलघफू इतका स्थिर राखत उर्वरीत आवकेचे पाणी दरवाज्यातून सोडले जात आहे. मुळा धरणसाठा समाधानकारक असताना मुळा नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावर फळ्या टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

संबंधित बंधारे भरून देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत होती. त्यानुसार मुळा पाटबंधारे विभागाने कोल्हापूर पद्धतीच्या मानोरी, वांजूळपोई, मांजरी येथील बंधारे भरून दिले आहेत. डिग्रस बंधार्‍यामध्ये पाणी जमा होत आहे. जोपर्यंत आवक सुरू असेल तोपर्यंत पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत जाणार आहे.

2006 नंतर सर्वाधिक विसर्ग 2022 मध्ये
सन 2006 मध्ये सर्वाधिक 40 हजार दलघफू इतके पाणी जायकवाडी धरणाकडे वाहिले होते. त्यानंतर सन 2019 मध्ये 25 हजार दलघफू इतके पाणी जायकवाडीला मिळाले होते. तर यंदाच्या वर्षी जायकवाडीला तब्बल 27 हजार 935 दलघफू इतके पाणी वाहिले आहे.

Back to top button