नेवाशात शिवीगाळ करून धमकावत जागा हडपण्याचा प्रयत्न | पुढारी

नेवाशात शिवीगाळ करून धमकावत जागा हडपण्याचा प्रयत्न

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा फाटा येथील 35 गुंठे जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 जणांसह अन्य पाच अनोळखी इसमांविरूध्द बुधवारी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवाशातील ज्ञानेश्वर वसंत घुले यांनी याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि.14 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान प्रवीण संतोष साळवे (रा.नेवासा फाटा), मुजफ्फर राजू शेख (रा.सेंट मेरी, नेवासा खुर्द) यांनी तुकाराम गणपत काळे (रा.भानसहिवरा) यांची 35 गुंठे वादग्रस्त जागा शिवाजी लक्ष्मण पाठक (रा. नजीक चिंचोली) यांच्या सांगण्यावरुन संतोष शेषमल फिरोदिया व अमित संतोष फिरोदिया (रा.कोठी रोड, अहमदनगर) यांच्याकडून पैसे घेऊन राजू जहागिरदार (रा.नेवासा) याच्या मदतीने खरेदी करून घेतली.

नेवासा महसूल विभाग, नेवासा भूमि अभिलेख कार्यालय, नगररचना नगर भाग व उपविभागीय कार्यालय नगर भाग येथील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून बनाबट कागदपत्रे, तसेच तुकाराम गणपत काळे (रा.भानसहिवरा) याच्या मार्फत खोटा चतु:सिमा तयार करून घेतला. आमच्या गट क्रमांक 13 गटापैकी पुनवर्सन जमीन व 1988 तहसील बिगरशेती जमिनीमधील 35 गुंठे क्षेत्र हडपण्याचा प्रयत्न केला. तसेच, राजू जहागीरदार, प्रवीण संतोष साळवे व मुजफ्फर राजू शेख व त्यांच्यासोबत अनोळखी 4 ते 5 इसम यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आम्हाला शिवीगाळ करून धमकावत जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे घुले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार नेवासा पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button