नगर : शिष्यवृत्तीचा टक्का वाढला..! पाचवीचे 28, तर आठवीचे 14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण | पुढारी

नगर : शिष्यवृत्तीचा टक्का वाढला..! पाचवीचे 28, तर आठवीचे 14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये नगर जिल्हा परिषदेच्या पाचवीचा 27.19, तर आठवीचा 13.23 टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेडपीचा पाचवीत 11 टक्के , तर आठवीचा 2 टक्के निकाल वाढल्याचे दिसले. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी नगरचा पदभार घेतल्यापासून शिष्यवृत्ती परीक्षेचा टक्का वाढविण्यासाठी काम सुरू केले होते. त्यासाठी सराव चाचण्या परीक्षा, विशिष्ट पुस्तिका उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन करणे, वाढीव तासीका, अशाप्रकारे नियोजन केले होते.

याकामी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांचेही पाटील यांना मोलाचे मार्गदर्शन मिळत गेले. त्यात परीक्षेच्या तारखा तीन वेळा पुढे गेल्याने विद्यार्थीही अस्वस्थ झाले होते. मात्र, तरीही मुख्याध्यापक, शिक्षकांनी ही एक संधी समजून तयारी करून घेतली. त्यामुळे यंदा नगरचा निकाल वाढणारच, मात्र तो किती वाढेल, याची उत्कंठा लागलेली होती.

जिल्हा परिषदेतून पाचवी शिष्यवृत्तीसाठी 32 हजार 248 विद्यार्थ्यांची परीक्षा नोंदणी झाली होती. यापैकी 30 हजार 292 परीक्षार्थींनी परीक्षा दिली, तर 1952 विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षेत 8236 मुले-मुली उत्तीर्ण झाले, तर 22 हजार 56 विद्यार्थी हे अपात्र झाल्याचे निकालातून पुढे आले.पाचवीचा निकाल हा 27.19 टक्के लागला आहे. गतवर्षी हा निकाल 15.72 टक्के लागला होता.
पूर्व माध्यमिक इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 20 हजार 32 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी 18 हार 821 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यावेळी 1211 अनुपस्थित होते. या परीक्षेत 2490 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल 13.23 टक्के लागला. गेल्यावर्षी हा निकाल 11.43 इतका लागला होता.

यावर्षी निकालाचा टक्का वाढला असला, तरीही तो अजुनही अपेक्षित नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शिक्षणाधिकारी पाटील यांनी भविष्यात हा टक्क आणखी वाढवण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रमही हाती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Back to top button