धानोरे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार | पुढारी

धानोरे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार

धानोरे : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील धानोरे शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. गेल्या सलग दोन दिवसात या बिबट्यांनी शेळी व कालवडीचा फडशा पाडल्याने येथील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धानोरे येथील थडीचा मळा परिसरात राहणार्‍या चांगदेव हरिभाऊ दिघे यांच्या मालकीची शेळी मंगळवार पाहटेच्या सुमारास शेजारीच गोठ्यातून ओढीत नेत त्या शेळीला आपले भक्ष्य बनविले.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे 5 वाजता याच वस्तीवर राहणारे कामगार पोलिस पाटील रंगनाथ भीकाजी दिघे यांचे कुटुंबीय गोठ्यात दूध काढत असताना सुमारे 2 वर्ष वयाची त्यांची कालवड दोन बिबट्यांनी जागेवर ठार केली. यावेळी या वस्तीवरील लोकांनी फटाके वाजवून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही न जुमानता सर्वांसमक्ष हे दोन बिबटे या कालवडीचे लचके तोडत होते. तासाभरानंतर स्वतःहून बिबटे या ठिकाणाहून निघून गेले. या दोन्ही घटनेचा वनरक्षक एम. एच. पठाण यांनी तत्काळ पंचनामा करून या ठिकाणी पिंजरा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी येथील शेतकर्‍यांना दिले. सदरील घटनेत या दोनही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून बिबट्याच्या मुक्त संचाराने या परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे.

Back to top button