नगर : जिल्ह्यातील 48 हजार मतदारांची नावे वगळली; मयत, दुबारांचा समावेश | पुढारी

नगर : जिल्ह्यातील 48 हजार मतदारांची नावे वगळली; मयत, दुबारांचा समावेश

नगर : पुढारी वृत्तसेवा :  भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमात नवीन नोंदणी तसेच मयत, दुबार मतदारांची वगळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 35 लाख 57 हजार 266 मतदारसंख्या असलेली प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली. वर्षभरात 48 हजार 610 मतदारांची नावे वगळली आहेत. यामध्ये मयत, दुबार मतदारांचा समावेश आहे. प्रारुप मतदार यादीवर 8 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

नवीन मतदार नोंदणीसाठी तसेच मतदार यादी बिनचूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत कार्यक्रम जाहीर केला. त्यासाठी निवडणूक विभागाने प्रारुप यादी प्रसिध्द केली. प्रत्येक नागरिकांनी आपले नाव यादीत आहे का याची खात्री करावी. नाव नसल्यास फॉर्म नमुना 6 भरुन तत्काळ भरावा. ज्या युवकाचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूणीं होत आहे. अशा युवकांनी देखील नोंदणी करावी. मतदार यादीत नाव, वय, लिंग व छायाचित्रांत काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी अर्ज नमुना 8 भरण्यात यावा. प्रारुप मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांच्या नावांची वगळणी करावी. यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.

नवीन मतदार नोंदणी व हरकती दाखल करण्यासाठी 1 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 3 डिसेंबर व 4 डिसेंबर या चार दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रारुप मतदार याद्यांवर 26 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. 5 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. ही यादी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार डॉ. चंद्रशेखर शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर रोडे हे उपस्थित होते.

 

Back to top button