खंडपीठाची पोलिस अधीक्षकांना नोटीस, मर्जीप्रमाणे फिर्याद द्यावी यासाठी मुलीस मारहाण | पुढारी

खंडपीठाची पोलिस अधीक्षकांना नोटीस, मर्जीप्रमाणे फिर्याद द्यावी यासाठी मुलीस मारहाण

नगर/औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा :  मर्जीप्रमाणे फिर्याद दाखल करावी यासाठी मुलीस मारहाण केल्याप्रकरणी नगर, नाशिक पोलीस अधीक्षकांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही चित्रीकरण नष्ट होणार नाही, याची दक्षता घ्यावी, झाल्यास तो पोलिसांविरोधात पुरावा ग्राह्य धरला जाईल, अशी तंबी खंडपीठाने दिली. श्रीरामपूर येथे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने ही मारहाण केल्याची याचिका थेट औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

श्रीरामपूर येथील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने त्यांच्या कार्यालयात याचिकाकर्त्यांच्या मुलीस बोलावून घेतले. मर्जीप्रमाणे फिर्याद द्यावी, यासाठी तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी मुलीस तेथीलच रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने खबर पाठविली, पण वरिष्ठ अधिकार्‍यांसह कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा दाखल करावा यासाठी अर्ज करणार्‍या याचिकाकर्त्या महिलेलाच धमकी देण्यात आली. तिने पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली, पण तेथेही न्याय मिळाला नाही. त्यामुळे महिलेने अ‍ॅड. मजहर जहागिरदार यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्याची प्राथमिक सुनावणी खंडपीठासमोर झाली.

सुनावणी दरम्यान अ‍ॅड. शेख मजहर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यालय आवारातील सीसीटीव्हीमध्ये कैद पुरावा नष्ट करण्याची भीती व्यक्त केली. त्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यालयाच्या आवारात घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण नष्ट होणार नाही, याची दक्षता घ्यावी, ते चित्रण नष्ट केल्यास तो पोलिसांविरोधात पुरावा मानण्यात येईल, असे निर्देश न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी दिले.

Back to top button