नगर : घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड ; पावणेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत | पुढारी

नगर : घरफोडी करणारी सराईत टोळी गजाआड ; पावणेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नगर : पुढारी वृत्तसेवा :  घरफोडी, दराड्यासह गंभीर गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. नेवासा तालुक्यातील खडका फाट्यावरून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीला गेलेले 115 गॅ्रम वजनाचे दागिने, रोख व गुन्ह्यात वापरलेली तवेरा कार असा नऊ लाख 75 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळु कांतीलाल काळे (वय 26, रा.नवापुरवाडी, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद), विदेश नागदा भोसले (वय 19, रा. नवापुरवाडी, ता.गंगापुर, जि. औरंगाबाद), भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे (वय 21, रा.मानगल्ली, नेवासा फाटा, ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

निखील बाळासाहेब वाघ (वय 22, रा. वाघवस्ती, कारेगाव, ता. श्रीरापूर) हे दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी घरी झोपलेले असताना चार जणांनी चाकूच्या धाक दाखवून व घरातील सदस्यांना मारहाण करून दोन लाख 71 हजारांचे दागिने चोरून नेले होते. तसेच, सचिन अरूण जगताप यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील 10 हजार रोख असा दोन लाख 81 हजारांचा ऐवज चोरून नेला होता.
श्रीरामपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी जबरी चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली होती की, आरोपी दानिगे विक्री करण्यासाठी औरंगाबादकडून नगरकडे येणार आहेत.

त्यानुसार, पथकाने खडका फाटा येथे सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. वाहनाची झाडाझडती घेतली असता एका पिशवीत दागिने मिळून आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाने केली.

आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल
आरोपी आर्यन कांतीलाल काळे याच्यावर नगर, औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, अपहरण असे 12 गुन्हे दाखल आहेत. तसेच, विदेश नागदा भोसले याच्यावर 4 व आदित्य कांतीलाल काळे याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत.

एसपी ओलांकडून एलसीबीचे कौतुक
पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गत काही दिवसांपासून एलसीबीच्या पथकाकडून अवैध धद्यांवर धाडसत्र सुरू आहे. त्यानंतर, कारेगाव येथील घरफोडीचा गुन्हा घडल्यानंतर चार दिवसांत गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केल्याच्या एलसीबीच्या दमदार कारवाईचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कौतूक केले आहे.

Back to top button