नगर : कार्तिकीची पंढरपूर यात्राही हाऊसफुल ! एसटीची दिवाळी अजूनही जोमात | पुढारी

नगर : कार्तिकीची पंढरपूर यात्राही हाऊसफुल ! एसटीची दिवाळी अजूनही जोमात

नगर : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या नगर विभागाने कार्तिकी एकादशीनिमित्त होणार्‍या पंढरपूर यात्रेसाठी 50 बसची व्यवस्था केली. भाविकांच्या गर्दीने पाच दिवस महामंडळाच्या बस हाऊसफूल धावत होत्या. अद्याप महामंडळाची दिवाळी जोमात सुरु आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर विभागाने जादा बस सोडल्या. तसेच अकरा दिवस दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली. दिवाळीत देखील बसला मोठा प्रतिसाद मिळाला. 21 ते 31 ऑक्टोबर या अकरा दिवसांत नगर विभागाला 8 कोटी 95 लाख 88 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. भाऊबीज जोमात सुरु असतानाच कार्तिकी एकादशीची पंढरपूर यात्रा सुरु झाली.

यासाठी 50 जादा बसची व्यवस्था केली. या बसला देखील भाविकांची मोठी गर्दी होती. पौर्णिमेपर्यंत पंढरपूर दर्शनवारी सुरुच होती. त्यामुळे विभागाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तुळशीचे लग्न लागले तरीही भाऊबीज सुरु आहे. त्यामुळे नगर विभागाच्या 550 बस अद्याप हाऊसफुल धावत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या नगर विभागाच्या तिजोरीत दररोज सरासरी 70 ते 75 लाखांचे उत्पन्न जमा होत आहे. त्यामुळे महामंडळाला दिलासा मिळत आहे.

देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी
दिवाळी आणि भाऊबीजमुळे महामंडळाचे सर्वच बसस्थानक प्रवाशांच्या गदींने फुलून गेले होंते. त्यामुळे विभागाने सर्वच साडेपाचशे बस रस्त्यांवर उतरविल्या होत्या. परंतु प्रवासादरम्यान, ब्रेक फेल, पंचर व इतर काही कारणामुळे काही बस नारुस्त झाल्या. त्यामुळे प्रवाशांना ऐन दिवाळीत ताटकळत बसण्याची वेळ आली होती. खबरदारी म्हणून महामंडळाने बसच्या देखभाल दुरुस्तीचे अभियान हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.

Back to top button