ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन : डॉ. तनपुरे कारखाना कामगार युनियन | पुढारी

ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन : डॉ. तनपुरे कारखाना कामगार युनियन

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणार्‍या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही केल्याने कामगार वर्गातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान, आज कारखाना कार्यस्थळावर लक्ष्मी-नारायण मंदिर आवारात कामगार युनियन, कृती समिती व कामगारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कारखाना व्यवस्थापन व जिल्हा बँकेला मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. 12 दिवसांच्या आत कुठलाही ठोस निर्णय न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

डॉ. तनपुरे साखर कारखान्याकडून कर्जाची परतफेड न झाल्याने व पुनर्गठन कराराचा भंग केल्याने जिल्हा बँकेने शनिवारी कारखाना सील केला. या कारवाईने कामगार वर्गात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आज (मंगळवारी) सकाळी लक्ष्मी-नारायण मंदिरात साखर कामगार युनियन व कारखाना कृती समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला कायम कामगार, मजूर हजेरी, संकलित तसेच सेवानिवृत्त कामगार उपस्थित होते.

यावेळी सचिन काळे, सुरेश थोरात, चंद्रकांत कराळे, अर्जुन दुशिंग यांनी भूमिका मांडली. युनियनचे माजी अध्यक्ष इंद्रभान पेरणे म्हणाले, कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे. सत्ताधारी व्यवस्थापनाच्या काळातील सर्व थकीत पगार मिळावे. ले ऑफ बाबत व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापन व जिल्हा बँकेला निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान, मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. पेरणे यांच्या जन आंदोलनाच्या भूमिकेस कामगार बांधवांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. ‘आम्ही सर्व कामगार आंदोलनात सक्रीय राहू, अशी शपथ लक्ष्मी-नारायण देवताच्या साक्षीने घेण्यात आली. यावेळी युनियन अध्यक्ष गजानन निमसे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, ईश्वर दुधे, राजेंद्र गागरे व कामगार उपस्थित होते.

Back to top button