नगर: नेप्ती कांदा मार्केटमध्ये वाद पेटला…व्यापार्‍यांच्या बदनामीचे षड्यंत्र, राजकीय हेतूने आरोप | पुढारी

नगर: नेप्ती कांदा मार्केटमध्ये वाद पेटला...व्यापार्‍यांच्या बदनामीचे षड्यंत्र, राजकीय हेतूने आरोप

वाळकी, पुढारी वृत्तसेवा: नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीने राज्यात कांद्याला उच्चांकी भाव देऊन नावलौकिक मिळविला आहे. परंतु, शेतकरी हिताचे आव आणणारे काही विघ्नसंतोषी लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी उपबाजारात गोंधळ घालून गुंडागर्दी करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. नेप्ती उपबाजार समितीत शेतकर्‍यांच्या मालाचे योग्य मूल्यमापन करणार्‍या आडते-व्यापार्‍यांची बदनामी करत आहेत, असा आरोप अहमदनगर ओनियन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिकरे यांनी केला आहे.

नगर बाजार समिती कांद्याची वाढती आवक लक्षात घेऊन नेप्ती उपबाजार सुरू करून, तेथे शेतकरी, आडते, व्यापारी आदींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. गेल्या अकरा वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, नगर तालुक्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील शेतकरी वर्गाच्या विश्वासास येथील आडते-व्यापारी पात्र ठरले आहेत. पारदर्शक व्यवहारामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा विक्रीस आणत आहे.

उपबाजार समितीमधून संपूर्ण भारतात, तसेच परदेशातही कांद्याची निर्यात केली जाते. भारतातील सर्व राज्यातील व्यापारी आपल्या मागणीप्रमाणे येथील आडते-व्यापार्‍यांकडून माल खरेदी करतात. त्यासाठी कोणत्याही व्यापार्‍यांस कोणतेही बंधन नाही.येथे प्रतवारीनुसार कांद्याचे लिलाव होतात. शेतकर्‍यांच्या मालाला कमाल भाव दिला जातो. कोणताही आडते-व्यापारी भाव पडण्याचे काम करत नाही. मात्र, शेतकरी हिताचा आव आणणारे काही विघ्नसंतोषी लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी उपबाजार समितीत गोंधळ निर्माण करीत आहेत.

‘शेतकरी हिताचे रक्षण करावे’

आडते-व्यापार्‍यांची बदनामी करत आहेत. त्यांनी कांदा व्यापार विषयक योग्य ती माहिती घेऊन, नंतरच आपले मत व्यक्त करावे. त्यांना जर खरंच शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळून न्याय मिळावा, असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतः लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी करावा व शेतकरी हिताचे रक्षण करावे, असे शिकरे यांनी म्हटले आहेे.

Back to top button