श्रीरामपूर : रब्बी पिकांसाठी शेतकर्‍यांची मशागतीची लगबग

श्रीरामपूर : रब्बी पिकांसाठी शेतकर्‍यांची मशागतीची लगबग

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : जून महिन्याच्या सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसला. आता पावसाचे हे घाव विसरून कशीबशी पैशाची तजवीज करीत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.  शेतीची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू आहे. खरीप हंगामातील पिके तोट्यात गेल्याने रब्बी हंगामावरच शेतकर्‍यांची मदार अवलंबून आहे. शेतकर्‍यांनी खाजगी कर्ज काढून, उसनवारी करून, वेळप्रसंगी बँका किंवा सोसायटीची कर्जे काढून खरीप हंगामातील पेरणी केली होती.

यंदा मात्र चांगला बहरलेला खरीप हंगामातील पिकांचा घास पावसामुळे हिरावून घेतला. खरिपाची पिके हातची वाया गेली. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. खरीप हंगामातील मशागत व पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकर्‍यांची परिस्थिती हालाकीची झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने रब्बी पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. तसेच अजून शेतशिवारात काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाफसा नसल्याने रब्बीची पेरणी उशिराने होणार आहे. तसेच परिसरात परतीच्या पावसाने विहिरी, तलाव, तुडुंब भरले असून, या पाणीसाठ्यांचा उपयोग सिंचनासाठी होणार आहे.

तालुक्यातील अनेक गावांत या वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने ज्वारी, मका यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या पावसाने ओढे, नाले, बंधारे, तलाव, विहिरी ह्या तुडुंब भरल्या आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षातील सर्वात मोठा पाऊस झाल्याने पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

खरीप हंगाम हातचा गेला असला तरी रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. परतीचा पाऊस थांबल्यानंतर शेतकर्‍यांनी ज्वारी, मका व अन्य पिकांची काढणी करून जमिनीची मशागत करून रब्बी पिकांच्या पेरणीला सुद्धा सुरूवात केली आहे.
गहू पेरणी सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये होते. मात्र पाऊस लांबल्याने पेरणीपूर्व मशागत या महिन्यात सुरू आहे. मशागतीला उशीर झाल्याने रब्बी हंगामातील पिके उशिराने घेतली जाणार आहेत.

श्रीरामपूर तालुुक्यातील पूर्व भागामध्ये यंदा जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे. अजूनही काही ठिकाणी जमिनीमध्ये पाणी साठले असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या उन्हाची तीव्रता चांगली जाणवत असल्याने लवकरच शेतीतील पाण्याचा निचरा होऊन शेत सुकेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. रब्बीच्या मशागतीसाठी वेळ कमी मिळणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये सध्या धावपळ असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

गहू, हरभरा पिकांचा पेरा वाढणार
सध्या शेतकरी गहू, हरभरा या पिकांची पेरणी करीत असल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गहू, हरभरा या पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या शेतकरी ट्रॅक्टर तसेच बैलजोडींच्या साहाय्याने मशागती करीत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news