गणोरे : विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना 100 टक्के मदत द्यावी | पुढारी

गणोरे : विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना 100 टक्के मदत द्यावी

गणोरे; पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाने सरसकट पंचनामे करावे, असे आदेश दिले. विमा कंपनी कोणतीही मदत शेतकर्‍यांना करताना दिसत नाही. तालुक्यातील सर्वच्या- सर्व विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना 100 टक्के मदत करावी, अशी मागणी अकोले तालुका गणोरे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केली.

अकोले तालुक्यात पावसाने पिके खराब झाली तर काही अक्षरशः सडली. सोयाबीन, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. विमा कंपनी मोठ्या प्रमाणावर अकोले तालुक्यातील विमा स्वरूपात मोठे हप्ते जमा करून नफा कमावत आहेत. प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मदत देण्याची वेळ आली असता मदत करण्यासाठी हात आखडते घेत आहे. अशी विमा कंपनीची दादागिरी अकोले तालुक्यातील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही सहन करणार नाही.

अकोले तालुक्यातील शेतकरी पुर्णतः हैराण झाला आहे. कृषी व संबंधित अधिकार्‍यांनी तत्काळ विमा कंपनीला समज देऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची 100 टक्के विमा मदत देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी स्वाभिमानीचे अकोले व तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे, उपाध्यक्ष सुनील पुंडे, कार्याध्यक्ष सुरेश नवले, युवा तालुकाध्यक्ष शुभम आंबरे, सोमनाथ आहेर, चंद्रकांत नेहे, अशोक दातीर, पोपट आहेर, प्रवीण आहेर, मयुर आंबरे. विवेक आंबरे, भाऊसाहेब आंबरे, शांताराम आंबरेनी ही मागणी केली.

अकोले तालुक्यात शेतकरी पुर्णतः हैराण झाला आहे.तालुक्यात विमा कंपनीनी भरपूर नफा कमावला. विमा कंपनीने शेतकर्‍यांना 100 टक्के मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करीत आहे. विमा कंपनीने शेतकर्‍यांना मदत न केल्यास विमा कंपनीच्या प्रतिनिधींना तालुक्यात फिरू दिले जाणार नाही.

                        सुशांत आरोटे (तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

Back to top button