नगर : झेडपीचे ‘ते’ 21 लेटलतिफ रडारवर! प्रशासनाकडून अचानक चार विभांगाची दप्तर तपासणी | पुढारी

नगर : झेडपीचे ‘ते’ 21 लेटलतिफ रडारवर! प्रशासनाकडून अचानक चार विभांगाची दप्तर तपासणी

नगर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यालयातील कार्यालयात वेळेत हजर न राहणारे 21 लेटलतिफ प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. काल सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण आणि बांधकाम विभागातील हजेरी पुस्तकांची अचानक पाहणी केली असता अनेक कर्मचारी हजर नसल्याचे पुढे आले. दरम्यान, बायमेट्रीक हजेरीची पडताळणी करून संबंधित कर्मचारी कायमच लेटबहादर असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गतीमान कारभार सुरू केला आहे. यात त्यांनी वेळोवेळी कर्मचार्‍यांना शिस्तीचे धडेही दिले आहेत. काल सीईओंच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या सुचनेनुसार माध्यमिक शिक्षण विभागात 10.20 वाजता अचानक कर्मचारी धडकले. त्यांनी हजेरी पुस्तक पाहिले असता, काही कर्मचारी वेळ होऊन गेला तरी कार्यालयात आलेले नव्हते.

त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभाग, बांधकाम दक्षिण विभाग, बांधकाम उत्तर विभागातही अचानक पोहचत हजेरी दप्तर तपासण्यात आले. त्या ठिकाणीही काही कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या नसल्याने ते हजर नसल्याचे दिसले. अशाप्रकारे वरील चारही विभागात साधारणतः 21 कर्मचारी हे लेटलतिफ दिसले. दरम्यान, सीईओंनी बायोमेट्रीक प्रणालीची पडताळणी करून त्यात नेहमीच लेट असणारे आणि कालच्या तपासणीतही लेट झालेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, असाही सूर दबक्या आवाजात येत आहे.

 

Back to top button