श्रीगोंदा : नगराध्यक्षा शुभांगी पोटेंच्या अपात्रतेवर लवकरच निर्णय | पुढारी

श्रीगोंदा : नगराध्यक्षा शुभांगी पोटेंच्या अपात्रतेवर लवकरच निर्णय

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे व नगरसेवक मनोहर पोटे यांच्या अपात्रतेवर सोमवारी (दि.7) मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले आहे. आता याप्रकरणी काय निर्णय देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी तक्रारदार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, शहराध्यक्ष सतीश बोरुडे, मनोहर पोटे, नगरपरिषद सहआयुक्त प्रशांत खांडकेकर उपस्थित होते. भोस यांच्या वतीने अ‍ॅड, पाटील यांनी, तर पोटे यांच्या बाजूने अ‍ॅड. फडणीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बाजू मांडली.

यावेळी पोटे यांच्या वकिलांनी ही अपात्रतेची तक्रार नगरसेवकांनी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर, भोस यांचे वकील पाटील यांनी तक्रारदार असलेले टिळक भोस हे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा नगरपरिषदेत काही उमेदवारांनी निवडणूक लढविली.

तसेच, सतीश बोरुडे हे स्वतः मनोहर पोटे यांचे मतदान प्रतिनिधी होते.त्याबाबतचे ओळखपत्र त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तक्रारदार दोघेही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे त्यांना, तसेच मतदार करणार्‍या नागरिकांना देखील अशाप्रकारे तक्रार करण्याचा अधिकार असल्याचे मत मांडले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लवकरच अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगितले. आता पोटेंच्या राजकीय भवितव्याबाबत काय निर्णय होणार, याबाबत होणार्‍या निर्णयाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे

Back to top button