नगर : रेल्वे उड्डाणपुलाचीही लवकरच दुरूस्ती : आ.जगताप यांच्या सा.बां.ला सूचना | पुढारी

नगर : रेल्वे उड्डाणपुलाचीही लवकरच दुरूस्ती : आ.जगताप यांच्या सा.बां.ला सूचना

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असून, याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत पुलाच्या दुरुस्तीबाबत सूचना दिल्या. या बैठकीस आ.जगताप यांच्यासह मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे वैभव कदम, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डिसेंबर 2019 मध्ये या रेल्वे उड्डाणपुलावर बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला होता. त्यात जीवित हानीसह अनेक जण गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून वैभव कदम हे रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत होते. त्यांनी राज्याचे बांधकाम सचिव, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती.

मात्र, याबाबत टाळाटाळ होत असल्यानेे कदम यांनी आ.जगताप यांच्याशी पत्रव्यवहार करीत ही बाब निदर्शनास आणून दिली. आ. जगताप यांनी याची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन, उड्डाणपुलावरील स्टेअर केस नव्याने बांधणे, जीर्ण झालेले कठडे काढून नवीन कठडे बांधणे, पांढरे पट्टे मारणे, रिफ्लेक्टर बसविणे आदी सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनीही संबंधितांना याबाबत आदेश दिले असून, दुरूस्तीचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले.

Back to top button