संगमनेरात ठाकरे शिवसेनेच्या दोन गटामध्ये बंडाळी! | पुढारी

संगमनेरात ठाकरे शिवसेनेच्या दोन गटामध्ये बंडाळी!

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहरासह तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जुन्या निष्ठावंत शिव सैनिकांना वरिष्ठांनी विश्वासात न घेता संपर्कप्रमुखांच्या आदेशाने नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या होत्या, मात्र संपर्कप्रमुखांच्या विरोधात सर्वत्र आंदोलने झाल्याने त्या सर्व नियुक्त्या अवघ्या चारच दिवसात स्थगिती देण्याची नामुष्की शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांवर आली. दरम्यान, ही स्थगिती जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचा आरोप संपर्क प्रमुख घोलप समर्थकांनी केल्यामुळे आता ठाकरे शिवसेनेत संगमनेरमध्ये बंडाळी निर्माण झाली आहे. दोन्ही गटांच्या समर्थकांनी संपर्क प्रमुखांसह जिल्हा प्रमुखांना या निवडीस कारणीभूत ठरवून टार्गेट केल्याचे चित्र दिसत आहे.

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा., राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर कार्यक्रमात हजेरी लावल्याची तक्रार पदाधिकार्‍यांनी वरिष्ठांपर्यंत केली. त्यामुळे आहेरांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी भाऊसाहेब हासे यांची निवड झाली होती. त्यामुळे आहेरांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले. ठाकरे शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांसह माजी पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत आहेरांच्या समर्थनार्थ निषेध सभा घेत शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांना टार्गेट केले. त्यांचा निषेध करून नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांवर आक्षेप घेतल्याची माहिती ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचली. ठाकरे सेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी तत्काळ नवीन नियुक्त्यांना स्थगिती देत जुन्या नियुक्त्या कायम ठेवल्याचे जाहीर केल्याने आनंदीत झालेल्या नुतन पदाधिकार्‍यांच्या आनंदावर चारच दिवसात विरजण पडले, मात्र जुन्या पदाधिकार्‍यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

नूतन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यास जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीच हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप करीत संपर्क प्रमुख बबन घोलप समर्थक शिवसैनिकांनी खेवरे यांना टार्गेट करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे जुन्या- नव्यांचा मेळ घालत संपर्कप्रमुख बबन घोलप व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांत मेळ घालण्याचे कडवे आव्हान ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठांसमारे उभे ठाकले आहे.

ठाकरे शिवसेना पक्ष अगोदरच अडचणीत असताना आता संगमनेरमध्ये संपर्कप्रमुख घोलप व जिल्हाप्रमुख खेवरे या दोन्ही गटांच्या समर्थक शिव सैनिकांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने ठाकरे सेना आणखी अडचणीत सापडली आहे. अनेक वर्षांपासून उत्तर नगर जिल्हाप्रमुख पद खेवरेंकडे आहे, अशात ठाकरे सेनेची ताकद वाढविण्याकरिता संपर्क प्रमुख घोलप यांची निवड जमेची बाजू ठरणार होती, परंतु त्यांच्या आदेशानव्ये झालेल्या नव्या पदाधिकारी निवडींना स्थगिती देणे ही गोष्ट घोलप यांच्यासाठी कमी पणाची ठरली आहे. त्यामुळे आता संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांच्या वादात ठाकरे शिवसेना वरिष्ठ स्तरावर नवीन निवडींवर नव्या- जुन्यांचा कसा मेळ घालणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जुन्या- नव्यांचा मेळ घालण्याचे आव्हान..!
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये या गटबाजीचा फटका ठाकरे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करताना आजी-माजी निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात घेतल्यामुळे त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.

Back to top button