शरद पवारांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे ! पंतप्रधान मोदींवरील टीकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर | पुढारी

शरद पवारांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे ! पंतप्रधान मोदींवरील टीकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर

नगर : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजकीय कालखंडात किती वेळा तत्व बाजूला ठेवून सत्तेसाठी अनेक गोष्टींना मुठमाती दिली, याचे अगोदर त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि मगच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करावी, असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्याला दिले. शिर्डी येथील अधिवेशनात शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

नगर येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे पाटलांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला. भाजपने शिंदे गटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर टीका केली जात आहे. मात्र महाविकास आघाडी सत्तेत असताना आपण काय काय तडजोडी केल्या, त्या राज्याने पाहिल्या आहेत. दुरान्वये ज्यांचा संंबंध नव्हता, तत्वाशी ज्यांचा संबंध नव्हता, आयडॉलॉजी विसंगत होत्या, तरीही तुम्ही सत्तेकरीता सगळ्या गोष्टींना मुठमाती दिल्याचाही आरोप मंत्री विखे यांनी केला.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेकडे सगळ्यांनी पाठ फिरवल्याचा दावाही विखे पाटील यांनी यावेळी केला. काँग्रेस म्हणतो शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. सत्ता गेल्यावर महाविकास आघाडीतून आता वेगळी भूमिका घेतली जाऊ लागल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कुठंतरी राष्ट्रवादीची बेरीज चुकली !
शिर्डीतील अधिवेशनात राष्ट्रवादीने मिशन 100 ची घोषणा केल्यासंदर्भात विखे पाटील म्हणाले, त्यांची बेरीज कुठे तरी चुकली असावी. प्रत्येक पक्षाला मिशन असावे. मात्र मागील तीन-चार निवडणुकांध्ये राष्ट्रवादीचे मिशन 40 पर्यंत थांबलले आहे. आता 40 पेक्षा कमी होऊ नये, याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

पिकविमा कंपन्यांकडून धूळफेक!
पिकविमा कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. यासंदर्भात विमा अधिकार्‍यांशी बैठक घेवू. त्यातून शेतकर्‍यांना त्यांची भरपाई मिळण्यासाठी लक्ष घालणार आहे. तसेच दररोज पंचनाम्यांबाबत आढावा घेत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनाही आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. ज्याचे नुकसान झाले, असा एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. ज्या-ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे, तेथे सरकार मदतीसाठी पुढे असल्याचेही विखे पाटलांनी सांगितले.

‘सिव्हिल’च्या आरोपींना क्षमा नाही!
अडीच वर्षात महाविकास आघाडीचे अनेक घोटाळे आहेत. ते त्यांनी गुंडाळून ठेवले होते. नगरमधील सिव्हील जळीतकांडाचा प्रश्न गंभीर होता. लोकांचे जीव गेले. त्याचा अहवाल मागविला आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांशी बोलणार आहे.
यात जे कोणी आरोपी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. निष्काळजीपणाला क्षमा नाही, कारण निरपराध लोकांचे बळी गेले आहेत.

 

Back to top button