नगरची 9 व्या स्थानी झेप शैक्षणिक सर्वेक्षणात झेडपीचे नेत्रदीपक यश | पुढारी

नगरची 9 व्या स्थानी झेप शैक्षणिक सर्वेक्षणात झेडपीचे नेत्रदीपक यश

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा शैक्षणिक निर्देशांकांत 424.25 गुण मिळवत अहमदनगर जिल्हा परिषदेने मागील वर्षीच्या 22 व्या स्थानावरून यंदा राज्यात 9 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिक्षण विभागाचे कौतुक केले असून, यामध्ये आपल्याला आणखी काम करायचे असल्याचेही त्यांनी संकेत दिल्याचे समजले. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार नवी दिल्ली यांचेकडून वर्ष 2017-18 पासून राज्याचा शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. त्याचा मुख्य उद्देश शालेय शिक्षणात बदलांना चालना देणे हा आहे. सुविधांसोबतच गुणवत्तेवर भर दिला जात आहे.

जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक भरताना 6 मुख्य निर्देशांक व त्याअंतर्गत असणारे एकूण 83 निर्देशकांच्या आधारे 600 गुणांचे गुणांकन केले जाते. भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणालीवर शाळांनी भरलेली माहिती, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, समग्र शिक्षा योजनेतील भौतिक सुविधा, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, स्कूल सेफ्टी व चाईल्ड प्रोटेक्शन अंतर्गत मंजूर बाबी डिजिटल लर्निंग अंतर्गत मंजूर बाबी, गव्हर्नन्स प्रोसेस अंतर्गत मंजूर बाबी, स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत मंजूर बाबी, स्वच्छ भारत आणि जलसुरक्षा,फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, इत्यादी स्त्रोतांद्वारे शैक्षणिक निर्देशांक काढला जातो. राज्यात 22 व्या क्रमांकावर होते, तर वर्ष 2020-21 च्या जिल्हा शैक्षणिक निर्देशांकांत 424.25 गुण मिळवत नगर राज्यात 9 व्या क्रमांकावर आहे. नुकतीच ही यादी प्रसिद्ध झाली असून, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन केले जात आहे.

झेडपी मराठी शाळा टाकू लागल्या कात
गेल्या काही दिवसांपासून सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शिक्षण विभागात विविध उपक्रम, गुणवता, शालेय, भौतिक सुविधांबाबतीत मोठे काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा कात टाकताना दिसत आहेत.

Back to top button