अखेर डॉ. तनपुरे कारखाना मालमत्ता सील, जिल्हा बँकेकडून मुख्य प्रवेशद्वार, केंद्रीय कार्यालय, पेपरमिल गेट बंद

अखेर डॉ. तनपुरे कारखाना मालमत्ता सील, जिल्हा बँकेकडून मुख्य प्रवेशद्वार, केंद्रीय कार्यालय, पेपरमिल गेट बंद

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  आर्थिक अरिष्टाने गुरफटलेल्या डॉ. तनपुरे कारखान्यावरील साडेसातीचा फेरा वाढतच आहे. संचालक मंडळाने जिल्हा बँकेच्या 500 रुपये टॅगिंगचा मुद्दा सांगत गाळप बंद करण्याचा निर्णय सभासद व कामगारांना डोकेदुखी ठरत असतानाच आता जिल्हा बँकेने द्विपक्षीय करार मोडल्याचे सांगत थेट कारखान्याची मालमत्ता जप्तीचा निर्णय घेतला. दरम्यान, अखेर आज (शनिवारी) जिल्हा बँक अधिकार्‍यांनी तनपुरे कारखान्याच्या मालमत्तेवर सील लावत जप्तीचे फलक लावले. या सर्व घडामोडी घडताना कामगार संतप्त झाल्याचे भावनिक चित्र दिसले.

तनपुरे कारखान्याच्या माध्यमातून साखरेची गोडी निर्माण होऊन ऊस उत्पादक, शेतकरी व कामगारांसाठी यंदाच्या गाळप हंगामात पर्वणी लाभेल, अशी अपेक्षा होती. जिल्हा बँक व तनपुरे कारखान्यामध्ये द्विपक्षीय करारातून 18 वर्षांसाठी हप्ते व व्याज रक्कम ठरवून देण्यात आली, परंतु त्यानुसार यंदाचा गळीत हंगाम बंद ठेवण्यात आल्याने द्विपक्षीय करार भंगाचा ठपका ठेवत जिल्हा बँकेने जप्तीच्या कारवाईचा बडगा उचलला. कागदोपत्री जप्ती झाल्याचे जाहीर केल्यानंतर अखेर जिल्हा बँक प्रशासनाकडून अधिकार्‍यांच्या उपस्थित विविध मालमत्तांना सील लावत जप्तीचे फलक कारखानास्थळी लावण्यात आले.

दरम्यान, खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संचालक मंडळाने सन 2017-18 साली कारखान्याचे गाळप सुरू केले. 2019-20 मध्ये ऊस टंचाईचे कारण देत गाळप हंगाम बंद ठेवण्यात आला. मागिल वर्षी कारखान्याच्या गाळप हंगामामध्ये 4 लक्ष 85 हजार मे.टन ऊस गाळप होऊन कारखान्याने यश संपादित केले, परंतु या काळामध्ये 48 कोटी रुपये जिल्हा बँकेला अदा करण्यात आले. संबंधित रक्कम ही व्याजापोटी जमा होऊन 90 कोटी रुपये व 21 कोटी व्याज अशी एकूण 111 कोटी रुपयांची थकीत रक्कम जिल्हा बँकेने वसुलीसाठी जप्तीचा निर्णय घेतला.

जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी नंदकुमार पाटील, जयंत देशमुख, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, मच्छिंद्र तनपुरे, गोरक्षनाथ मंडलिक, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब कोतकर, राजेंद्र शेरकर या जिल्हा बँकेच्या पथकाने कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार, केंद्रीय कार्यालय, पेपरमिल गेट या ठिकाणी सील बंदची कारवाई केली. कारखाना कार्यस्थळी जिल्हा बँकेने जप्ती केल्याचे फलक लावण्यात आले.
सील बंदच्या कारवाईमुळे कारखान्यावर पेट्रोल पंप बंद झाले. सर्व ठिकाणावर गेट बंद केल्याने आता संचालक मंडळ कामगारांबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय साखर कामगार युनियचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सेक्रेटरी सचिन काळे, इंद्रभान पेरणे, सीताराम नालकर, सुरेश थोरात, बाळासाहेब थोरात आदींनी जिल्हा बँक पथकाची भेट घेत निवेदन दिले. तनपुरे कारखान्याचे सन 2022-23 या काळातील गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

यासह कारखाना कॉलनी, पाणी वीज बिल व अत्यावश्यक सेवेबाबत गरजेचे असलेले कामगारांनी कमी करू नये, कारखान्याची निविदा मागविल्यास कामगारांची 100 कोटी थकीताचा उल्लेख असावा, निविदा प्रक्रियेवेळी कामावर असलेल्या कर्मचार्‍यांनाच प्राधान्याने नियुक्ती मिळावी, कारखाना गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची निविदा प्रक्रिया राबवून गळीत सुरू करण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी कामगारांनी केली. कार्य. संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते.

कारवाईने कामगारांचे भवितव्य पुन्हा अंधारात!
डॉ. तनपुरे कारखान्याचा वापर केवळ सत्तेसाठीच होतो, असे नेहमी बोलले जाते. असाच काहीसा प्रकार वर्षानुवर्षे होऊन कारखान्यावर कर्जाचे डोंगर उभारले गेले. आज संकट काळामध्ये तनपुरे कारखान्यावर जिल्हा बँकेच्या जप्ती कारवाईने सर्वाधिक नुकसान कामगारांचे झाले. अत्यल्प पगार घेऊनही अहोरात्र झटणार्‍या कामगारांच्या जिवनात पुन्हा अंधार पसरल्याची भावना कामगार युनियनचे माजी अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news